कल्याण ग्रामीण : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या डोंबिवली विधानसभेत मंजूर झालेल्या तीन काँक्रीट रस्त्याचे काम रद्द करण्यात आल्याने भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे (Vikas Mhatre) आवाक् झाले आहेत. हे रस्ते काय कारणामुळे रद्द करण्यात आले, याची कारणे म्हात्रे यांना माहिती नाहीत. मात्र, भाजपच्या राज्यात आणि भाजप मंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप नगरसेवकाच्या प्रभागातील महत्वाचे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम रद्द झाल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात शिवसेना भाजपची सत्ता असताना २०१४ ते २०१९ सालच्या दरम्यान एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे काम करण्यासाठी ४७२ कोटी रुपये खर्चास मंजूरी दिली होती. मात्र, २०१९ साली राज्यात सत्तापालट झाला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ४७२ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांना रद्द करण्यात आल्याने डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी विकासाचे मारेकरी असे बॅनर शहरात लावून महाविकास आघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले.
शिंदे-फडणवीस सरकारने डोंबिवलीतील रस्ते विकासाच्या कामाकरीता ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या रस्ते विकासाची कामे सध्या सूर करण्यात आलेल्या आहे. ही कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. ३६० कोटी रुपये रस्ते विकासाच्या कामात व त्या आधीच्या ४७२ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांच्या यादीत डोंबिवली पश्चिमेतील भाजपचे माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या प्रभागातील तीन रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा समावेश होता. त्यामध्ये सुभाष रोड ते कुंभारखान पाडा, श्रीधर म्हात्रे चौक ते रिंग रोड आणि जिजामाता रोड ते खंडोंबा मंदिर रोड यांचा समावेश होता.
आत्ता कामाला सुरुवात झालेली असली तर या तीन रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली आहेत. अचानक ही कामे रद्द करण्यामागील कारण काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महत्वकांक्षी रिंग रोड प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर मोठा गाव ठाकूली ते माणकोली हा खाडी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रिंग रोडचे काम दुर्गाडी ते टिटवाळापर्यंत अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे कामाची निविदा काढण्यात आलेली आहे. या रिंग रोडला जोणारे म्हात्रे यांच्या प्रभागातील तीन रस्ते महत्वाचे होते. नेमकेच त्याच रस्त्याचे काम रद्द करण्यात आले. या रस्त्यांच्या कामाचा पुनर्विचार एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी करावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.