
भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग
भाजपकडून याेगेश समेळ, दिपक पाेटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, प्रसन्न जगताप, राजेश येनपुरे, गायत्री खडके, श्रध्दा प्रभुणे, जयंत भावे, आरती काेंढरे, शंकर पवार आदी विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची प्राथमिक माहीती पुढे येत आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली गेली नाही. विद्यमान नगरसेवकांपैकी श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर या वरीष्ठ नगरसेवकांची नावे यादीत समाविष्ट असुन, काही विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी, मुलगा, मुलगी यांना संधी दिली गेली आहे.
एकीकडे भाजपने विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुनील पांडे, निलेश काेंढाळकर, नितीन पंडीत ( पत्नीला उमेदवारी ) आदींना संधी दिल्याचे दिसते. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले बाळा ओसवाल, विशाल धनकवडे, सचिन दाेडके, सायली वांंजळे आदींना संधी दिली गेली आहे. भाजपने नाराजी टाळण्यासाठी यादी जाहीर न करता थेट एबी फाॅर्मच देण्याचा पर्याय निवडला.
भाजपने १०० जागांपैकी बहुसंख्य जागांवर उमेदवार निश्चित करत त्यापैकी ८० जणांना थेट एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत नेते गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना महापालिका निवडणुकीत संधी देण्याचा दिलेला शब्द भाजपने पाळला आहे. कुणाल टिळक यांना तसेच गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना प्रभाग क्रमांक २६ मधून उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना एबी फॉर्मही वितरित करण्यात आला आहे.