
राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?
भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती सुरू केली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून शुक्रवारी सुमारे दोन तास शासकीय विश्रामगृहाच्या दालनामध्ये खलबते झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाज खासदार उदयनराजे भोसले यांनी केले तर उमेदवार निवडला जाताना तो निवडून येण्याच्या क्षमतेचा असावा, त्याला राजकीय समन्वय आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळण्याची हातोटी अशा विविध गुणांची गरज आहे, अशी मांडणी जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी केली.
जास्तीत जास्त चेहऱ्यांना संधी
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या समन्वयक चर्चेमध्ये भाग घेतला. आपले विचार मांडत मैत्रीपूर्ण लढती आणि महायुती अशा दोन्ही गोष्टींवर जोर दिला. सातारा जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे राजकीय बलाबल लक्षात घेता आणि जास्तीत जास्त चेहऱ्यांना संधी देणे, त्यासाठी राजकीय समीकरणे तपासणी या दृष्टीने रचना करावी लागणार आहे, अशी भूमिका बैठकीत मांडली. त्यानुसार आगामी बैठकीत बूथ प्रमुख, मंडल प्रमुख, केंद्रप्रमुख यांच्याकडून मतदार याद्या मागवून घेऊन त्या दृष्टीने समन्वयकांशी चर्चा केली जाणार असल्याचे अतुल भोसले यांनी सांगितले.
हास्यविनोदात रंगले प्रतिनिधी
खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृहाच्या पोर्चमध्ये हास्य विनोदांत रमलेले दिसून आले. राजकीय रणनीती जिल्ह्यात ठरवण्याच्या दृष्टीने भाजपने वरचष्मा ठेवला असून, त्यादृष्टीने पहिल्याच झालेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय समोर आल्याने राजकीय विश्लेषकांच्या सुद्धा भुवया उंचावल्या आहेत. पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना गाठले असता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला.
संग्राम बर्गे यांना संधी मिळणार का?
उदयनराजे यांचे समर्थक संग्राम बर्गे यांची सातारा नगरपालिकेसाठी जोरदार निवडणुकीची तयारी सुरू होती, मात्र त्या प्रभागात इतर मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने त्यांची अडचण झाली आहे. या संदर्भात संग्राम बर्गे यांना संधी देणार का असे उदयनराजे यांना विचारले असता त्यांना संधी देणार परंतु निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या त्या परिस्थितीत वेळ बघून निश्चितच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. मुख्याधिकारी अभिजित बापट बराच काळ साताऱ्यात सक्रिय आहेत. त्यावर उदयनराजे म्हणाले, अभिजित बापट यांचे काम चांगले आहे. ते प्रशासन अत्यंत कसोशीने चालवतात. ते चांगले काम करतात म्हणून आम्ही त्यांना साताऱ्यात ठेवले आहे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.