
माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा; पडळकरांचा विरोधकांना टोला
पडळकर म्हणाले, सावंत घराणे ४० वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिले. स्व. पतंगराव कदम यांचा आशीर्वाद त्यांना लाभला, तरीही या निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले. प्रभाग क्रमांक ३ मध्ये विक्रमसिंह सावंत यांनी आपले पुत्र धैर्यशील सावंत यांना उमेदवारी दिली; मात्र भाजपने सर्वसामान्य, दुर्लक्षित घटकातील गौतम ऐवाळे यांना संधी दिली. या लढतीत ऐवाळे यांनी धैर्यशील सावंत यांचा १५९ मतांनी पराभव केला. हा लोकशाहीचा कौल असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, माजी आमदार विलासराव जगताप यांनाही त्यांच्या नातवाला निवडून आणण्यात अपयश आले. प्रभाग क्रमांक ११ मध्ये संग्राम जगताप यांचा भटक्या समाजातील तरुण उमेदवाराने पराभव केला. या प्रभागात भाजपचे मिथुन भिसे हे मोठ्या फरकाने विजयी झाले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे पडळकर म्हणाले.
घराणेशाहीला छेद, लोकशाहीचा विजय
जतच्या राजकारणात काही काळ घराणेशाही रुजवण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र यंदा मतदारांनी स्पष्टपणे घराणेशाहीविरोधात कौल दिला आहे. यापुढे जतच्या राजकारणात व्यक्ती नव्हे तर लोकशाही जिंकेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत पडळकर यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज असल्याचे संकेत दिले.