सुधीर मुनगंटीवार यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन पार पडला आहे. दोन्ही गटाकडून हा दिन साजरा करण्यात आला असून राजकीय टोलेबाजी देखील करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनावेळी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल केला. “पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजवले ना बारा. आता वाजवले की बारा तुमचे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला होता. त्यावरुन भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे हे फक्त वृक्षाची फांदी
उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे म्हणाले, त्यांची चंद्रपूरमध्ये जनतेने नखं उपटली आहेत. ते आता लंडनला वाघनखं आणायला चाललेत’ अशी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळ वृक्ष नाही तर फक्त वृक्षाची फांदी आहे. ती फांदी घेऊन ते शब्दाच्या काड्या करतात. त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीही शिल्लक नाही. ठाकरे गटापेक्षा काँग्रेसने लोकसभेला जास्त जागा जिंकल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आता टीका करताना स्वाभिमान विसरतात. वाघनखांबाबत ते टीका करतात. अशी टीका केल्यानंतर काही विशिष्ट भागातील मतदान आपल्याला पडेल असा त्यांचा समज आहे, असे प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
उद्धव ठाकरेंवा गणित कोणी शिकवलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या जागी भाजप हारलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचाराला गेले त्या ठिकाणी त्यांनी सर्व जागा जिंकल्या का? राहुल गांधींनी ज्या ठिकाणी प्रचार केला त्या सर्व जागा जिंकल्या का? मग आता असं गणित कोणत्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं याचा अभ्यास करावा लागेल. एखाद्या ठिकाणी तु्म्ही जिंकलात. आता ससा कासवाच्या कथेमध्ये एकदा कासव जिंकलं. कासवाने यांच्या सारखं केलं होतं. मात्र, नंतर ते कासव कोणत्याच स्पर्धेत जिंकलं नाही, असा घणाघाती टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.