
भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता
पहिली उमेदवार यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता असून, उर्वरित दोन याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या रणनीतीमागे नाराज इच्छुकांना सावरून घेणे आणि बंडखोरी रोखणे, हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सुमारे ३० ते ४० माजी नगरसेवकांना यावेळी डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाराज नेते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संभाव्य पक्षांतराला आळा घालण्यासाठीच भाजपने उमेदवार जाहीर करण्याची ही टप्प्याटप्प्याची खेळी आखल्याचे बोलले जात आहे.
पुण्यातील उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी शहरातील भाजप पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुक्कामाला होते. शुक्रवारी सायंकाळी या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, बहुतांश उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पुण्यात परतल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून काही उमेदवारांना प्रचार सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात केली असून, पहिल्या यादीत सुमारे ४० ते ६० उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ज्यांना अद्याप तिकीटाबाबत स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत, अशा इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेकांनी मुंबईत तळ ठोकत वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.
युतीच्या गणितावर लक्ष केंद्रित
पुण्यात भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि शिवसेनेसोबत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. रिपाईकडून दहा जागांची मागणी करण्यात आली असली तरी भाजपकडून त्यांना पाच ते सात जागा देण्याची शक्यता आहे. शिवसेनेला १५ जागा देण्याबाबत प्राथमिक तयारी असून, त्यात आणखी काही जागांची भर पडू शकते.
मात्र, शिवसेनेकडून तब्बल ३५ जागांची मागणी करण्यात आली असून, समाधानकारक जागावाटप न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुले ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून युतीच्या चर्चांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, युती झाली नाही तर संबंधित प्रभागांसाठी स्वतंत्र उमेदवारांची तयारीही पक्षाने करून ठेवली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.