
पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?
भाजपने पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दूर ठेवल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाशी युती नको, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा झाली; मात्र जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने ही युती फिस्कटली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
समान प्रमाणात जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचा प्रबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला ती जागा दिली जाईल. एकजुटीने भ्रष्ट भाजपच्या विरोधात लढा देणार आहोत. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), मनसे आणि समविचारी पक्षांनी भाजपविरोधात एकत्रित मोट बांधली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी तिन्ही प्रमुख पक्षांना समान जागावाटप करण्यात आले आहे. शिवसेनेबरोबर मनसे आहे. तसेच समविचारी मित्रपक्षांनाही १५ जागा देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवेल. – संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
असे असेल जागावाटप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ५०
काँग्रेस – ५०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) – ५०
समविचारी मित्रपक्ष – १५
अजित पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने युती शक्य झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय झाला आहे. – अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)