
इचलकरंजीत भाजपचा ठरला मोठा भाऊ
सार्वत्रिक निवडणूकीत महायुतीचा दणदणीत विजय
ठाकरे गटाला मिळाली एकच जागा
इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत महायुतीने 47 जागांवर विजय मिळवत महानगरपालिकेवर भगवा फडकविला आहे. त्यामध्ये 43 जागांसह भाजपा मोठा भाऊ ठरला तर शिवसेना शिंदे गटाला 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला आणि विरोधी शिव शाहू विकास आघाडीला 17 जागा मिळाल्या. तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची एकमेव मशाल पेटली. अनेक प्रभागात अनपेक्षित असे निकाल लागले. तर विजयाची अपेक्षा असलेल्या जागांवर पराभव सोसावा लागला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
गत महिन्याभरापासून इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी माजली होती. एकूण 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. राजीव गांधी भवन येथे निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. परंतु अत्यंत संथ गतीने प्रक्रिया सुरु असलेने निकाल कळण्यास थोडा विलंब होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली जात होती.
एकाचवेळी 16 प्रभागातील फेरीनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी चार विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभागांच्या मतमोजणीमुळे निकाल घेताना सर्वांचा गोंधळ उडत होता. मतमोजणीसाठी कक्षात गेलेले उमेदवार प्रतिनिधी बाहेर आल्यानंतरच नेमकी परिस्थिती कळत होती. पहिल्या दोन फेर्यांमध्ये आपापल्या उमेदवारांच्या आघाड्यानंतर शहरातील विविध भागामध्ये जल्लोषाला सुरुवात करण्यात आली. 3, 8, 9, 13, 15, 16 याठिकाणी अत्यंत चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले. या प्रभागातील निकाल शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची उत्कंठता वाढविणारा ठरला. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिव शाहू विकास आघाडीने एकहाती सत्ता घेतली. प्रभाग 3 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी भाजपच्या राजू चव्हाण यांचा पराभव केला. तर याठिकाणी भाजपने 2 व शिवसेनेने 1 जागा मिळविली. प्रभाग 4 मध्ये भाजपने एकहाती सत्ता घेतली असली तरी शिवशाहू आघाडीचे सयाजी चव्हाण यांनी शिवसेनेचे दिलीप झोळ यांचा पराभव केला.
Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत काँग्रेसला मोठा धक्का; शहर अध्यक्षासह ‘हे’ बडे नेते पराभूत
प्रभाग 5 मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजी संभाजी पाटील हे जायंट किलर ठरत भाजपच्या सुनिल पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. तर उर्वरीत 3 जागा भाजपाला मिळाल्या. प्रभाग 6 मध्ये क्रॉस वोटींगचा धक्का एकाला बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाजपच्या चारही उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळविला. प्रभाग 7 मध्ये मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील शिव शाहू विकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी विजय प्राप्त केला असला तरी सामाजिक कार्याच्या बळावर प्रमिला रवींद्र जावळे या विजयी ठरल्या. प्रभाग 8 कडे सर्वांचे लक्ष वेधले होते. याठिकाणी शिवसेनेचे रवींद्र माने आणि भाजपच्या रुपा उदय बुगड यांनी विजय मिळविला असला तरी प्रतिष्ठेच्या बनलेल्या जागेवर संजय तेलनाडे यांनी भाजपच्या राहुल घाट यांचा पराभव केला. प्रभाग 9 मध्ये शिव शाहू विकास आघाडीला जोरदार धक्का देत भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय खेचून आणला.
प्रभाग 10, 11 आणि 14 मध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सर्व जागा चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या. प्रभाग 12 मध्ये संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिव शाहू विकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला. याठिकाणी भाजपचे चारही उमेदवारी जिंकले. प्रभाग 13 मध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. मतमोजणीही त्याचा प्रत्यय दिसून आला. आघाडीच्या अमरजित जाधव यांनी भाजपच्या रणजित लायकर यांच्यावर थोडक्या मतांनी विजय मिळविला. प्रभाग 15 मध्ये सागर चाळके यांच्या नेतृत्वाखाली आघाडीला निकालानंतर मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. याठिकाणच्या चारही भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. चाळके यांच्या कन्येला पराभवाचा धक्का बसला. स्वत: आवाडे परिवार ज्या प्रभागात राहण्यास आहे त्या प्रभाग 16 कडे समस्त शहराचे लक्ष लागले होते. याठिकाणी तेलनाडे परिवारातील दोन सदस्यांनी आपली विजयी पताका फडकविली. तर उर्वरीत 3 जागांवर भाजप विजयी ठरला.
सर्वात प्रथम प्रभाग 5 चा जाहीर झालेला निकाल सर्वांना धक्कादायक ठरला. उबाठाच्या शिवाजी पाटील यांनी एकमात्र विजयाची मशाल पेटवली. त्यानंतर प्रभागनिहाय निकालात कुठे महायुतीने तर कुठे शिव शाहू विकास आघाडीने विजय प्राप्त करत सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली. अखेर 65 जागांपैकी 47 जागावर महायुतीने, 17 जागावर शिव शाहू विकास आघाडीने तर 1 जागावर उबाठाने विजय प्राप्त केला. निकाल जाहीर होताच प्रत्येक प्रभागात समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. तर काही समर्थकांनी शहरातून मोटरसायकली रॅली काढत जल्लोष केला. या निवडणूकीत आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, युवा महाराष्ट्र सेना, बहुजन समाज पार्टी, बहुजन सोशलिस्ट पार्टी, एआयएमआयएम या पक्षांसह मैदानात उतरलेल्या 59 अपक्ष उमेदवारांना या निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Maharashtra Politics: ‘या’ महानगरपालिकेत क्रॉस व्होटिंगची चर्चा; धक्कादायक निकालाची शक्यता
एकाच घरात तीन नगरसेवक
पहिल्या महानगरपालिका निवडणूकीत तीन दाम्पत्य वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात होते. त्यामध्ये संजय तेलनाडे (प्र. 8) आणि सौ. स्मिता तेलनाडे (प्र. 16) मधून दोघेही विजयी झाले.
पती पराभूत पत्नी विजयी
विद्यमान नगरसेवक अब्राहम आवळे (प्र. 9) हे पराभूत झाले. तर त्यांच्या पत्नी सौ. क्रांती आवळे (प्र. 7) या विजयी झाल्या. या उलट अमरजित जाधव (प्र. 15) हे विजयी झाले तर त्यांच्या पत्नी सौ. मंजुश्री जाधव (प्र. 16) या पराभूत झाल्या.
माजी नगरसेवक पती पत्नी पराभूत
प्रभाग 15 मधून लढणारे माजी नगरसेवक प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी मनिषा पाटील हे पती-पत्नी पराभूत झाले.
बाप लेकीचा पराभव
प्रभाग 12 मधून शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे तर प्रभाग 9 मधून त्यांची कन्या संतोषी कांबळे हे निवडणूक लढवत होते. या बाप-लेकींना पराभूत व्हावे लागले.
माजी आमदार पुत्र पराभूत
माजी आमदार अशोकराव जांभळे हे प्रभाग 3 मधून तर त्यांचे चिरंजीव सुहास जांभळे हे प्रभाग 2 मधून रिंगणात होते. त्यामध्ये अशोकराव जांभळे हे विजयी झाले तर त्यांचे पूत्र सुहास जांभळे पराभूत झाले.
काका पुतणीचा पराभव
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे आणि त्यांची पुतणी अॅड. रोहिणी मोरबाळे ही काका-पुतणीची जोडीही पराभूत झाली.