इचलकरंजीत धक्कादायक निकालांची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
इचलकरंजीत क्रॉस व्होटिंगची चर्चा जोरात
स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना मतदारांचा कौल
धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता
राजेंद्र पाटील / कोल्हापूर: इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर आता शहराच्या राजकीय वर्तुळात क्रॉस व्होटिंगचा मुद्दा जोरदार चर्चेत आला आहे. कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवारांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले असून इचलकरंजीच्या काही प्रभागांमध्ये निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीपूर्वी काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी स्वतःला ‘सेफ’ ठेवण्यासाठी क्रॉस व्होटिंगचा फंडा अवलंबल्याची चर्चा होती. मतदानाच्या दिवशी त्याची प्रचिती अनेक मतदान केंद्रांवर आल्याचे चित्र दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मत न देता, स्वच्छ प्रतिमा, स्थानिक कामाचा अनुभव आणि व्यक्तिगत ओळख या निकषांवर अनेक मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले आहे.
विशेषतः काही प्रभागांमध्ये पक्षीय गणिते कोलमडण्याची चिन्हे दिसत असून, मतदारांनी पक्षापेक्षा उमेदवाराला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी एका पक्षाच्या मतदारांनी दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारा सह नोटाला मतदान केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पारंपरिक मतबँकांवर अवलंबून असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतदानाच्या दिवशी विविध केंद्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मतदारांनी उघडपणे ‘पक्ष नको, माणूस चांगला हवा ‘ अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः तरुण मतदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांनी पक्षीय राजकारणापेक्षा स्वच्छ प्रतिमा, उपलब्धता आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा आहे.
काही प्रभागातील उमेदवारांना ‘लक्ष्मी दर्शना’चा ही मोठा फायदा होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही प्रभागांमध्ये आघाडीचे मानले जाणारे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे, तर तुलनेने दुर्लक्षित किंवा कमकुवत समजले जाणारे उमेदवार अचानक पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळू शकतात, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, विविध पक्षांचे नेते आणि उमेदवार आता आपल्या-आपल्या प्रभागातील आकडेमोडीत व्यस्त झाले असून, क्रॉस व्होटिंग कितपत झाले याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणच्या प्रभागात निष्ठांवत कार्यकर्त्यांची पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत क्रॉस व्होटिंग हा निर्णायक घटक ठरणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली असून, निकालाच्या दिवशी अनेक प्रभागांत राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






