
मतदान माझं, पण हक्क बजावला कुणी? बोगस मतदाराचे धक्कादायक प्रकार समोर (Photo Credit- X)
कल्याण पूर्व येथील गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर एक धक्कादायक घटना घडली. सुमन भालचंद्र गायकवाड या महिला मतदार आपल्या पती आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. मात्र, जेव्हा त्या केंद्रात गेल्या, तेव्हा त्यांचे मतदान आधीच कोणीतरी करून गेल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. मतदार यादीत नाव असूनही आणि स्वतः उपस्थित असूनही मतदान करता न आल्याने गायकवाड कुटुंबाने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
असाच प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्येही समोर आला आहे. कोपरखैरणे येथील नॉर्थ पॉईंट स्कूल मतदान केंद्रावर सोपान संपत सकपाळ ही व्यक्ती मतदानासाठी आली असता, त्यांचेही मत आधीच कोणीतरी दिल्याचे उघड झाले. अपक्ष उमेदवार वैशाली बर्वे यांचे पती ज्ञानेश्वर माऊली बर्वे यांनी या सर्व प्रकाराचे फेसबुक लाईव्ह केले. प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच लोकशाहीच्या उत्सवात असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आज राज्यातील २९ महापालिकांच्या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत (EVM) बंद होणार असून, उद्या १६ जानेवारी रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच समोर आलेल्या या बोगस मतदानाच्या घटनांमुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.