पुणे : शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वारजे माळवाडी परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी अडीच लाखांंच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
दरम्यान, सतत घडणाऱ्या घरफोड्यांच्या या घटनांनी मात्र पुणेकर हैराण आहेत. पोलिसांना या टोळ्यांचा छडा लागत नसल्याचेही वास्तव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचा फ्लॅट बंद असताना बुधवारी रात्री साडे दहा ते आकराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील रोकड, सोन्याचे व चांदिचे दागिने असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.