सातारा : सातारा लोकसभेसाठी भाजपच्या वतीने मी आहेच, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराची पूर्णतः आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागातील मतदारयाद्यानुसार लोकांशी गाठीभेटी, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये नागरिकांशी अनौपचारिक चर्चा अशा उपक्रमांवर उदयनराजे यांनी जोर देत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या सात याद्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अजूनही उदयनराजे भोसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, तरीही पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले आहे, असे ठामपणे विधान करत उदयनराजे भोसले आणि राजे समर्थक प्रचाराला लागले आहेत. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उदयनराजे यांनी केवळ दहा मिनिटे हजेरी लावली. कराड दक्षिणचे नेते अतुल बाबा भोसले हे स्वतः उदयनराजे यांच्या गाडीचे सारथ्य करत त्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन आले.
महायुतीच्या उमेदवारासाठी सातारा, वाई, कराड या तीन ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आले आहे. हा पक्षाचा अजेंडा झाला तरी उदयनराजे स्वतः निवडक कार्यकर्त्यांसह भिरकिट करू लागले असून, त्यांनी मतदारसंघनिहाय गाव पिंजून काढायला सुरुवात केली. मागील दोन दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते जिल्हाध्यक्ष यांच्या गाठीभेटींवर उदयनराजे यांनी जोर दिला होता.
उदयनराजे यांनी उन्हाची रखरख असतानाही त्याची तमा न बाळगता जनसंवाद कार्यक्रमावर जोर दिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उदयनराजे यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, सातारा लोकसभेला काट्याची टक्कर होईल असा अंदाज आहे.