यवत : मुळा -मुठा नव्या कालव्यावर जमिनीवरून आणि भरावांच्या दोन्ही बाजूने आतून सिमेंटचे पक्के अस्तरीकरण करण्यात येत आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्यातून होणारा पाझर, झिरप पूर्णपणे बंद होईल. यामुळे विहिरी, बोअर, ओढे, नाले यांना पाझर व झिरप यामुळे येणारे पाणी पूर्णपणे बंद होऊन त्याचा शेत पिकावर मोठा परिणाम होऊन पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे कालव्यावर आधारित शेतकरी वर्गाने चिंता व्यक्त केली आहे.
मुळा – मुठा नवा कालवा हा खडकवासला येथून निघून हवेली, दौंड या तालुक्यातून पुढे इंदापूरला जातो. हा नवा कालवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. कालव्याच्या दक्षिण भागातील शेती पेक्षा उत्तर भागातील शेतीवर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. पाटबंधारे खात्याने नव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम हवेली आणि दौंड तालुक्यात वेगाने सुरू केले आहे. खाली जाड कागद अंथरून त्यावर ६ इंच जाडीचे आतून अस्तरीकरण करण्यात येत आहे.
विहिरी, बोअर बंद पडणार
उन्हाळ्यात पाणी आवर्तन दरम्यान काही दिवस कालवा बंद झाल्यास प्रथम पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात. जास्त दिवस कालवा बंद राहिल्यास शेतपिकावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास पाझर पूर्णपणे बंद होऊन ओढे नाले, ओहळ कोरडेठाक पडतील. विहिरी बोअर बंद पडतील, याचा शेत पिकावर मोठा परिणाम होऊन पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात तर येईलच. यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होउन त्यांचे प्रपंच अडचणीत येतील, अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नव्या कालव्याच्या अस्तरीकरणास तीव्र विरोध केला असून, दौंड मधील शेतकरी मात्र चिंता व्यक्त करून गप्प बसले आहेत.
[blockquote content=”नव्या कालवा अस्तरीकरणामुळे शेती व्यवसाय धोक्यात येईल. यासह अन्य अनेक परिणाम भोगावे लागतील, हे शेतकरी विरुद्ध काम आहे. या विरुद्ध शेतकरी संघटना दौंड तालुक्यात लढा उभा करेल.” pic=”” name=”- सुनील नातू, अध्यक्ष, दौंड तालूका शेतकरी संघटना.”]