case of beating and ragging was revealed in a residential hostel in Kolhapur crime news
Kolhapur Crime News : कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील एका निवासी हाॅस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन अनेक लहान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच याच हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६, रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) जखमी झाला. पहाटे पाचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. पेठवडगाव पोलिस ठाण्यात संबंधित हाॅस्टेलच्या रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी सिद्धीविनायकला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. मात्र, या प्रकरणानंतर पालक वर्गातून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हाॅस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सीपीआर चौकीत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा मुलगा संबंधित शाळेमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. तो त्याच ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत आहे. ६ ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा मुलगा आणि वर्गातील विद्यार्थी पृथ्वीराज कुंभार यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकीद दिली होती. याच भांडणाच्या कारणावरून पीटी परेडवेळी आरोपीने जखमी विद्यार्थ्यास स्टेजवर नेऊन मारहाण केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमानुष पद्धतीने लहानग्या विद्यार्थ्याना मारहाण विद्यार्थ्यांकडून केली जात आहे ते पाहता अंगावर शहारे येतील. असा हा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे. गॅलरीमध्ये विद्यार्थ्याना लाईनमध्ये उभे करून अत्यंत बेदम पद्धतीने दोन ते तीन विद्यार्थी अत्यंत निर्दयीपणे मारहाण करताना दिसून येत आहेत. एकजण बॅटने दिसेल त्याला मारताना दिसून येत आहे. अन्य एका व्हायरल व्हिडिओ स्वच्छतागृहात हातात सापडेल त्या वस्तूने मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतक्या निर्दयी आणि अमानुष पद्धतीने मारहाण होत असताना संस्थाचालक काय करत आहेत असा प्रश्न पडला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या संस्थेच्या संस्थापकाने सदरची संस्था आपल्या वडिलांचे नावे काढली आहे. या प्रकरणाची वाच्यता बाहेर होऊ नये याबाबतची खबरदारी घेतली होती. तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही दम दिला होता. मात्र अखेर हे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारे रॅगिंग होत असल्याचे समोर आले. यामुळे शाळेमध्ये देखील विद्यार्थी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.