पीएमपीच्या बसमधूनच सीसीटीव्ही गायब; प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, तिकिट दर तर वाढवले, सुविधांचे काय?
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीए हद्दीतील लाखो नागरिकांना बससेवा पुरविली जाते. नुकतेच पीएमपीएमएलला झालेल्या तोट्याचे कारण देत तिकीट दरात तब्बल दुप्पट वाढ करण्यात आली. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक बसमध्ये बसवलेलेच नाहीत, हे ‘नवराष्ट्र’च्या प्रतिनिधीच्या तपासणीतून समोर आले आहे.
दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतात. अशावेळी बसमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी आणि आवश्यक वेळेस पुरावा म्हणून उपयोगी ठरणारे सीसीटीव्ही कॅमेरे अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. काही बसमध्ये कॅमेऱ्यांची यंत्रणा असूनही ती बंद अवस्थेत आढळली, तर काही ठिकाणी कॅमेऱ्याचे फक्त खोकले शिल्लक होते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, महिलांना छेडछाड, पाकिटमार, वादविवाद अशा घटनांमध्ये सीसीटीव्हीचा वापर महत्त्वाचा ठरतो. मात्र, अनेक बसमध्ये ही सुविधा नसल्याने अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. प्रवाशांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “तिकीट दर वाढवत आहेत, पण सुरक्षेची हमी कुठे आहे?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बऱ्याच बसमध्ये नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे
सीसीटीव्ही कॅमेरे हे महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहेत. बऱ्याच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरी किंवा अन्य चुकीचे प्रकार घडतात. विशेष: म्हणजे राञी प्रवास करताना भीती वाटते, त्यामुळे पीएमपीएमलच्या प्रशासनाने या महत्वपर्ण विषयाकडे तातडीने लक्ष द्यावे.