
Chandrapur News: चंद्रपुरात वाहतुकीचा बोजवारा! सावरकर आणि बंगाली चौकातील सिग्नल बंद; प्रवासासाठी नागरिकांची कसरत
सावरकर चौक आणि बंगाली चौक हे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र मानले जातात. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी, ऑटो, अवजड वाहने तसेच पादचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असते. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कामावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे या चौकांमध्ये वाहनांची गर्दी वाढते. अशा परिस्थितीत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणाच बंद असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
सिग्नल बंद असल्यामुळे कोणत्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यायचे, याबाबत स्पष्टता राहत नाही. प्रत्येक वाहनचालक आपापल्या सोयीनुसार मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असल्याने चौकात अनेकदा वाहनांची कोंडी निर्माण होते. काही वेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. घाईत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात किरकोळ अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सिग्नल बंद असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसलेल्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड असल्यास तातडीने दुरुस्ती करावी. तसेच दुरुस्ती होईपर्यंत या दोन्ही चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.
सावरकर चौकातील सिग्नल शार्ट सर्कीट झाल्यामुळे बंद पडलेले आहे. ते दुरुस्तीचे काम सुरू असून एक दोन दिवसात सिग्नल सुरू केला जाईल, बंगाली कॅम्प चौकातील सिग्नलचे पोल ट्रकमुळे वाकलेले आहे. त्यामुळे ते सिग्नल दुरुस्ती करण्यासाठी चार पाच दिवसांचा कालावधी लागणार. दोन्ही सिग्नल दुरुस्तीसाठी वाहतूक शाखेतर्फे प्रयत्न केले जात आहे.- अमोल बारापात्रे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर