Dia Mirza यांच्या व्हिडीओवरून Kishori Pednekar यांचा घणाघाती सवाल
मुंबई : मुंबईत सध्या महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या जनजागृती मोहिमेवरून वेगळाच वाद रंगला आहे. महापालिकेच्या या मोहिमेअंतर्गत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा यांनी व्हिडिओमार्फत जनजागृतीपर आवाहन केले होते. पण, भाजपने या व्हिडीओवरून नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर महापालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो काढून टाकण्यात आला. त्यामुळेच आता नवा वाद निर्माण झाला आहे.
यावरूनच आता राजकीय वाद रंगत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सडकून टीका केली आहे. किशोरी पेडणेकरांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांच्यावर निशाणा साधत “आपल्याला न पटणारी भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवणे, ही भाजपची पद्धत झाली आहे,” असे म्हंटले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी या विषयावरून माध्यमंही संवाद साधत प्रतिक्रिया दिली. बृहन्मुंबई महापालिकेवर टीका करत त्या म्हणाल्या, “महापालिकेने एकदा एखाद्या कलाकाराची जनजागृतीसाठी नियुक्ती केली आणि तो कलाकार मुंबईकरांना प्रदूषणाबाबत मोफत जनजागृती करत असेल, तर त्यात गैर काय? एकदा निर्णय जाहीर केल्यानंतर पुन्हा बॅकफूटवर जाणे, हे मुंबई महापालिकेला शोभनीय नाही. ही बाब निंदनीय आहे.”
“दिया मिर्झा कोण आहेत, हे माहिती आहे का? त्यांनी देशाला अनेक पारितोषिके मिळवून दिली आहेत. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे. त्या तिथल्या पर्यावरणाच्या प्रश्नांवरही बोलतात. आपल्याला न पटणारी भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवणे, ही भाजपची पद्धत झाली आहे,” असे त्या म्हणाल्या.
महापौर रितू तावडे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, “महापौरांना तर या संपूर्ण प्रकरणाची माहितीच नाही. वारंवार त्यांचा अपमान होत आहे. अशा बालिश महापौरांना मी उत्तर देणार नाही. त्यांनी आधी महापालिकेचे कामकाज समजून घ्यावे.”
“अमित साटम कोण आहेत? ते विधानसभेचे आमदार आहेत आणि भाजपचे पदाधिकारी असतील. मात्र, इथे महापौर बसले आहेत ना? मग महापालिकेचा कारभार महापौरांच्या माध्यमातूनच चालायला हवा. महापालिकेला स्वतःचे स्वतंत्र कायदे आणि अस्तित्व नाही का? मुंबई महापालिका भाजपच्या दावणीला बांधली आहे का? मुंबईकरांनी हे लक्षात घ्यावे की, मुंबईचा अपमान होत आहे आणि महापालिका प्रत्येक वेळी बॅकफूटवर जात आहे,” अश्या शब्दांत त्यांनी टीका केली.
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिवाळीच्या काळात जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झाचाही सहभाग होता. दियाने व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईकरांना फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचं आवाहन केलं होतं. दिवाळीचा आनंद साजरा करताना पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश तिने दिला होता.
मात्र, अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तो डिलीट केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. अमित साटम यांनी या व्हिडीओवरून टीका करताना ‘दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिला मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी हि आमची परंपरा आहे, ती आमच्या मुळापर्यंत रुजली आहे. आम्हाला कुणीही हे शिकवायला जाऊ नाई,” असे ते म्हणाले.
महापालिकेने व्हिडीओ डिलीट केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना दिया मिर्झा म्हणाल्या, “भलाईचा जमानाच राहिला नाहीये. या मोहिमेसाठी आपण कोणतेही पैसे घेतले नव्हते.”
त्यामुळे आता हा विषय केवळ पर्यावरण जनजागृतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर मुंबई महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेवरून राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे.
Ans: प्रदूषणमुक्त दिवाळी मोहिमेतील दिया मिर्झाच्या व्हिडीओवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून व्हिडीओ हटवला.
Ans: दिवाळीत फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळावं आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असं आवाहन दिया मिर्झाने केलं होतं.
Ans: किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केली. महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.






