लातूर : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रशेखर ऊर्फ हणमंत पाटील असे आत्महत्या केलेल्या त्यांच्या भावाचे नाव आहे. लातूरमधील शिवराज पाटील यांच्या देवघर येथील निवासस्थानी चंद्रशेखर पाटील (Chandrashekhar Patil) यांनी स्वत: वर गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चंद्रशेखर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते चुलत भाऊ होते. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
चंद्रशेखर चाकूरकर यांनी आधीच आत्महत्या करण्याचे पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. आज सकाळी जेव्हा ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मोबाईलवरुन जवळच्या व्यक्तींना ‘गूड बाय’ असा मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सऍपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शिवराज पाटील यांचे बंधू असलेल्या चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. पण त्यांच्या आत्महत्येनंतर लातूरमध्ये खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.