Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजपासून बिहारमध्ये (Bihar) ‘मतदार अधिकार यात्रा’ (Voter Adhikar Yatra) सुरू केली आहे. मतदार यादीतील त्रुटींच्या विरोधात महाविकास आघाडीने बिहारच्या सासाराममधून या यात्रेची सुरुवात केली. ही यात्रा सुमारे १६ दिवस चालणार असून, त्यात राज्यातील २५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या यात्रेत राहुल गांधींसोबत तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) आणि डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांनीही सासाराममध्ये या यात्रेत हजेरी लावली. यात्रेच्या सुरुवातीपूर्वी राहुल गांधींनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला.
जनसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएस देशभरात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे निवडणूक होते, तिथे ते जिंकतात. ‘आम्ही थोडी तपासणी केली तेव्हा लक्षात आले की, निवडणूक आयोगाने (EC) जादूने महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार केले आहेत. जिथेही नवीन मतदार तयार झाले, तिथे भाजपच्या युतीने विजय मिळवला,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे आणि आता कर्नाटकातही त्यांनी तपास सुरू केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, पण भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून ते मागितले नाही. आम्ही सीसीटीव्ही आणि व्हिडिओग्राफी मागितली तर त्यांनी नकार दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी केली जात आहे. आता ते बिहारमध्येही मतदारांना वगळून निवडणुकांमध्ये चोरी करण्याची तयारी करत आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही त्यांना असे करू देणार नाही. बिहारची जनताही हे होऊ देणार नाही. निवडणूक आयोग काय करत आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे की निवडणूक आयोग कशी चोरी करत आहे. आम्ही त्यांची ही चोरी पकडून जनतेसमोर आणणार आहोत.’
तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. ‘हा संविधान वाचवण्याचा संघर्ष आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारची झोप उडवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माझे मोठे भाऊ राहुल गांधी आहेत,’ असे तेजस्वी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ‘मोदी-नितीश यांनी बिहारला फसवले आहे. ही जुनी-पुराणी सरकार बदलण्याची वेळ आली आहे.’
‘प्रत्येक ठिकाणी गुन्हेगार सरकार चालवत आहेत. या सरकारचा बदला घ्यायचा आहे,’ असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणुकीत मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तेजस्वी यांनी निवडणूक आयोगालाही इशारा दिला. ‘मोदी, शाह, आणि निवडणूक आयोग यांनी ऐकावे, बिहार लोकशाहीची जननी आहे. येथे राहुल, तेजस्वी आणि महागठबंधन लोकशाहीची हत्या होऊ देणार नाहीत,’ असे ते म्हणाले.