निगडी : निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल येथे पुण्याकडून येणाऱ्या बीआरटी बसेस व अन्य वाहनांच्या नियंत्रणासाठी असलेल्या सिग्नलची वेळ एकच असल्याने यमुनानगरकडे वळणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पीएमपी बसेस रांगेत पुढे जातात त्यामुळे यमुनागरकडे वळणे अन्य वाहनांना शक्य होत नाही. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. वाहन चालकांची गैरसोय दूर करण्यासाठी येथील सिग्नलच्या वेळेत बदल करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट) यमुनानगर विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना विभागप्रमुख सतीश मरळ यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले. सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी हे निवेदन स्वीकारले. या प्रसंगी उपविभागप्रमुख प्रवीण पाटील उपस्थित होते. निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल येथे पुणे-मुंबई महार्गावर बीआरटी बसेस व अन्य वाहनांची यमुनानगर, प्राधिकरण, पुणे व मुंबईकडे सतत वर्दळ असते. या वाहनांच्या नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागातर्फे सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे.
यमुनानगरकडे वळणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय दूर करा
परंतु, या सिग्नलमध्ये बीआरटी बसेस व यमुनानगरकडे वळणाऱ्या वाहनासाठी सिग्नलची वेळ एकच आहे. त्यामुळे पुण्याकडून येणाऱ्या बीआरटी बसेसची रांग सुरु होते. त्यामुळे यमुनानगरकडे वळणा-या सिग्नलची वेळ संपून जातो. त्यामुळे यमुनानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. वाहन चालकांची गैरसोय दूर करण्यासह वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीआरटी व अन्य सिग्नलच्या वेळा वेगवेगळ्या कराव्यात, अशी मागणी मरळ यांनी निवेदनात केली आहे.