
'नवराष्ट्र इम्पॅक्ट'! स्वारगेट स्थानकात चार्जिंग सुविधा उपलब्ध; सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन बोर्ड
अनेक ठिकाणी चार्जिग बोर्ड होते परंतु ते तुटलेल्या आणि बंद पडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असे. आताच्या डिजिटल युगात मोबाईल हे केवळ संवादाचे नव्हे, तर तिकीट बुकिंग, लोकेशन ट्रॅकिंग आणि आपत्कालीन संपर्काचे प्रमुख साधन बनले आहे. त्यामुळे चार्जिग सुविधा आता मुलभूत गरज बनलेली आहे.
स्वारगेट स्थानकावर चार्जिंग सुविधा नसल्यामुळे अगोदर अनेक वेळा गैरसोयीचा सामना करावा लागत होता. बसस्थानकात चार्जिग सारखी महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करूण दिल्याने निश्चितच आम्हा प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. – प्रतिभा जाधव (प्रवाशी)
गेल्या सात दशकांपासून लाखो प्रवाशांच्या हालचालीचे केंद्रबिंदू हे स्वारगेट बसस्थानक आहे. दररोज या स्थानकावरून सुमारे १,३०० बस सुटतात आणि १,५०० बस बाहेरून येतात. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी चार्जिंग सुविधा ही मूलभूत गरज बनली आहे. परंतु स्वारगेट बसस्थानकावर फक्त एकच चार्जिंग प्लग उपलब्ध होते. तेही बहुतांश वेळा बंद अवस्थेत असायचे, प्रवाशांच्या तक्रारीनुसार, अनेक वेळा मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे त्यांना आप्तेष्टांशी संपर्क साधणे किंवा प्रवासासंबंधी माहिती मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. तंत्रज्ञानाच्या युगात इतक्या महत्त्वाच्या बसस्थानकावर चार्जिंगची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असे. परंतु आता एसटी प्रशासनाने चार्जिग सुविधा उपलब्ध करूण दिल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
चार्जिग सुविधा आताच्या काळात महत्वाची आहे. कारण कोणत्याही गोष्टीसाठी मोबाईलचा वापर हा करावाच लागतो. मी सोलापूर येथून आलो, त्यामुळे लांबचा प्रवास करत असताना स्थानकांवर चार्जिग प्लग असणे अत्यंत आवश्यक आहे आणि या सुविधेचा लाभ घेत आहे. – प्रताप कदम (प्रवाशी)