शिरवळ : सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी या ठिकाणी आज सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत जोरदार स्वागत केले. चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. सातारा सीमेवर त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारांची सातत्याने पाठराखण केलेली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. प्रथमतः साताऱ्यात प्रवेश होत असताना हा उत्साह तरुण आणि सामान्य जनतेचा आहे. या उत्साहाचे प्रतीक एकच आहे की, या लोकांच्या मनामध्ये जे आहे, ते आपल्याला उस्फूर्तपणे पाहायला मिळत आहे.
सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा इतिहास घडवेल. चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले, या निवडणुकीत मी सामान्य जनतेसाठी असेल, या सातारा जिल्ह्यातील लोकांना जो बदल हवा होता, सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा, एक वेगळ्या प्रकारचा व्हिजन असणारा नेता असावा, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. तरुणाचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न आयटी हब औद्योगिक विकास स्थानिकांचा रोजगार तसेच सामान्य शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न असलेली तेच भरून काढण्याचे माझे पुढचे ध्येय असेल.
सातारा जिल्ह्याचा विकास व स्वाभिमान उभा करण्याचा प्रयत्न असेल. समोर कोण उमेदवार आहे, हे पाहिलेला नाही आणि माझी कोणासोबत स्पर्धा नाही माझी स्पर्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. त्यामुळे मी या लढाईमध्ये पवार साहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलो आहे. जनतेच्या ताकतीवर मी ही निवडणूक लढविणार आहे. यावेळी जनतेत फार मोठा उठाव आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल.