आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं...
इंदापूर : विधानसभेच्या लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. विधीमंडळाच्या आवारामध्ये झालेला हा राडा ही पहिलीच वेळ असल्यामुळे विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. यावरुन आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, परंपरा होत्या आणि सरकारला कैचीत पकडण्याची चर्चा जोरात चालायची, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले. इंदापूर येथील समता परिषदेचे जेष्ठ नेते पांडुरंग शिंदे यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ गुरुवारी भेटीसाठी आले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
छगन भुजबळ म्हणाले, मी १९८५ साली विधानमंडळात आलो. आज ४१ वर्षे झाली. १९९१ साली महसूल मंत्री होतो. त्यानंतर अनेक मंत्रिपदे भूषवली. त्यावेळी केशवराव धोंडगे, दत्ता पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार, गणपतराव पाटील असे अनेक परखड नेते होते. सरकारला प्रश्न विचारून कैचीत पकडण्याचा प्रयत्न होत असे. त्या काळी नितीन गडकरी, राम नाईक, प्रतापराव पाटील, एन. डी. पाटील यांसारखे अभ्यासू नेतेही सभागृहात होते. सभागृहात टोकाच्या चर्चा झाल्यावरही बाहेर सर्वजण एकत्र बसून चहा घेत असत. सभागृहाच्या कार्यपद्धतीला आणि परंपरांना मान दिला जात होता. मात्र आता या सगळ्याचं चित्र पालटलं आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळात झालेल्या राड्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, काही लोक खरंच कामासाठी येतात. लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊन येतात. परंतु काहीजण फक्त फिरण्यासाठी, कोणालातरी भेटून काम सांगण्यासाठीच येतात. काहींचा तर वेगळाच धंदा झालेला आहे. पण याच वेळी काही प्रामाणिक लोकही आहेत जे प्रश्नांवर उपाय शोधतात. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री प्रयत्नशील आहेत. पवार साहेबांनीही सांगितलंय की मुख्यमंत्री फडणवीस अतिशय कष्ट करणारा मनुष्य आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, एक माणूस चूक करतो आणि त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, व विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का बसतो. जनतेच्या मनात संपूर्ण व्यवस्थेबद्दल वाईट दृष्टिकोन तयार होतो, हे खरंच दु:खद आहे. यावेळी भुजबळ यांनी पांडुरंग शिंदे यांच्या ‘हरी सुंदर शुद्ध तेल मिल’ची पाहणी केली आणि त्याचे विशेष कौतुक केले.