
सुखना नदी पुनर्विकास प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शनिवारी शहरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी सुखना नदी पुनरुजीवन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. pic.twitter.com/itd9oSa47y — Chhatrapati Sambhajinagar Smart City (@cssmartcity) December 6, 2025
दूषित पाण्याबद्दल आयुक्तांची तीव्र नाराजी
सुखना नदीचे रुंदीकरण व खोलीकरणचे काम पूर्ण झाले असून लवकरच पिचिंगच्या कामाला सुरुवात होणार आहे. आयुक्तांनी पाहणीदरम्यान प्रकल्पाचा वेग, गुणवत्ता आणि नियोजनाची माहिती घेतली. नदीकाठाने वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्याबाबत प्रशासक जी. श्रीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कार्यकारी अभियंता (ड्रेनेज विभाग) यांना नदीत येणारे दूषित पाणी पूर्णतः थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांशी संवाद आणि श्रमदान
प्रशासकांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नागरिकांनी नदी पुनर्विकासामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल आणि पर्यावरणाची स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी यांनी आयुक्तांना प्रकल्पाची प्रगती, तांत्रिक उपाययोजना आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली.
“सामाजिक सहभागातून विकास अधिक प्रभावीरीत्या घडतो,” असे सांगून आयुक्तांनी नागरिकांना नदी पुनर्विकास उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः नदीच्या काठावर दगड बसवून श्रमदान करून व्यक्तिगत सहभागाचे प्रभावी उदाहरण घालून दिले. पाहणीनंतर आयुक्तांनी चिकलठाणा येथील शनिआश्रम मंदिरास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.