मध्यरात्री आरोग्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट (Photo Credi t- X)
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे १:०० वाजता अचानक भेट दिली. रुग्णालयातील आपत्कालीन सेवा, स्वच्छता, औषधसाठा, विभागांचे कामकाज, यंत्रसामग्रीची स्थिती यांची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून उपचारांची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा, सेवा वेळेवर मिळत आहेत का याची… pic.twitter.com/QewSuNXQb9 — Prakash Abitkar (@abitkar_prakash) December 7, 2025
त्रुटींवरून मंत्री आबिटकर नाराज
पाहणीदरम्यान काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींमुळे मंत्री आबिटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले. रुग्णसेवा अधिक शिस्तबद्ध, सुटसुटीत आणि वेळेवर देण्याची काळजी घ्यावी. रुग्णालयातील आहाराच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. औषधांचा तुटवडा कोणत्याही परिस्थितीत होऊ नये आणि यंत्रसामग्री कार्यरत ठेवावी. माता-प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, लसीकरण मोहीम गतीने राबविणे आणि शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
ढिलाई आढळल्यास कारवाई अपरिहार्य
“रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि तातडीची सेवा मिळालीच पाहिजे. ढिलाई आढळल्यास कारवाई अपरिहार्य आहे,” असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला. यावेळी उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
खाजगी डॉक्टरांशी संवाद आणि नियमांत शिथिलता
रविवारी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शहरातील खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. खासगी रुग्णालयांच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता ३ वर्षांवरून ५ वर्ष करण्यात येत आहे. छोट्या रुग्णालयांना फायर ऑडिटमध्ये दिलासा देण्यासाठी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींसंदर्भात लवकरच नगरविकास व प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत चर्चा केली जाईल. प्रशिक्षित नर्सेसंदर्भातील अटीला काही कालावधीसाठी शिथिलता दिली जाईल. ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘ईएसआयसी’ योजनेतील उपचाराचे क्लेमचे पैसे महिनाभरात मिळतील. आरोग्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना आवाहन केले की, “तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केले पाहिजे आणि रुग्णांना माफक दरात सेवा द्यावी.”
कंत्राटदारांच्या बिलांबाबत कठोर इशारा
हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे झालेल्या मराठवाडा परिमंडळस्तरीय आरोग्य आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी प्रशासकीय कामकाजातील त्रुटींवर लक्ष वेधले. शासकीय रुग्णालयांत अस्वच्छता आणि कामातील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. स्वच्छता, लॉन्ड्री व्यवस्था आणि रुग्णांचा आहार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. “कंत्राटदारांकडून मिळणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष पडताळणी न करता बिल मंजूर करणे ही चुकीची पद्धत आहे. यापुढे तक्रार आढळल्यास संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यापूर्वी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा त्यांनी दिला.






