
Foreign Tourists in Maharashtra ( महाराष्ट्रात परदेशी पर्यटक दाखल )
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवाची ओळख जगभरातील पर्यटकांना करून देणारी रेल्वे म्हणून डेक्कन ओडिसीची ख्याती आहे. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विशेष पसंती देतात. राजेशाही थाट, आलिशान सुविधा आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांची सफर हे या रेल्वे प्रवासाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांसाठी डेक्कन ओडिसीचा प्रवास हा केवळ रेल्वे प्रवास न राहता महाराष्ट्राच्या पर्यटन आणि संस्कृतीचा अनुभव देणारा ठरतो.
शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डेक्कन ओडिसी रेल्वेचे संभाजीनगर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. स्वागतानंतर हे पर्यटक वेरूळ आणि दौलताबाद येथील ऐतिहासिक पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी रवाना झाले. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, कैलास मंदिरातील अव्दितीय शिल्पकला तसेच दौलताबादचा ऐतिहासिक देवगिरी किल्ला ही या परिसराची प्रमुख आकर्षणे आहेत. त्याचे प्रत्यक्षात दर्शन पर्यटकांना घेता येणार आहेत. यंदा ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि लंडन येथून आलेल्या ३६ पर्यटकांच्या या भेटीमुळे शहराच्या पर्यटन वैभवाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक वारसा आणि देवगिरी किल्ल्याचा गौरवशाली इतिहास यामुळे या पर्यटकांसाठी ही सफर संस्मरणीय ठरणार आहे. दरम्यान, या दौऱ्यामध्ये भारत सरकार पर्यटन विभागाचे गाई विवेक पाठक, संजय वासवानी आणि विकास मिटकर हे या पर्यटकांना पर्यटनस्थळांची ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती देणार आहेत. या पर्यटकांच्या आगमनामुळे पर्यटन क्षेत्रात उत्साह निर्माण झाला आहे.
अकोला महापालिकेसमोर 262 कोटींच्या करवसुलीचे आव्हान; करावर वाढतोय व्याजाचा बोजा
रेल्वेस्थानकावर उत्तरताच सर्व पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. स्थानिक कलावंत दिलीप खंडेराय आणि इतर कलावंतांच्या वतीने पर्यटकांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी कलावंतांनी पारंपरिक वेशभूषा साकारून भारतीय संस्कृतीचे दर्शन विदेशी पर्यटकांना घडविले. भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या स्वागताने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले.
छत्रपती संभाजीनगरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा मोठा वारसा लाभला आहे. अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा यासारखी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक शहरात येतात. विशेषतः डेक्कन ओडिसीसारख्या राजेशाही पर्यटन रेल्वेच्या माध्यमातून परदेशी पर्यटक शहरात दाखल होत असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व अधोरेखित होत आहे.