
रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ! १०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा (Photo Credit - AI)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी झोपायला गेले होते. मात्र, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अनेक कर्मचाऱ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही जणांना थंडी वाजून तापही आला. त्रास वाढू लागल्याने संस्थेच्या आवारात गोंधळ उडाला आणि तातडीने रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या.
रेल्वे रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार
बाधित कर्मचाऱ्यांना तातडीने मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती
सकाळपासूनच इन्स्टिट्यूट ते रेल्वे रुग्णालय दरम्यान रुग्णवाहिकेच्या फेऱ्या सुरू होत्या. अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये देशभरातून रेल्वे कर्मचारी प्रशिक्षणासाठी येत असतात, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशासकीय भूमिका
एकाच वेळी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याने रेल्वे प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.