
बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक (Photo Credit- X)
निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना काकासाहेब काकडे यांना भावना अनावर झाल्या. समर्थकांची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. कार्यकत्यांनी त्यांना कडकडून मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. बराच वेळ काकडे यांना आपले अश्रू आवरणे कठीण जात होते. हा क्षण उपस्थितांसाठीही भावूक करणारा ठरला.
एकीकडे विजयाचा जल्लोष आणि भावनिक क्षण, तर दुसरीकडे मतमोजणीवरून निर्माण झालेला तणाव, घोषणाबाजी आणि पोलिस हस्तक्षेप अशा विविध घटनांनी गरवारे मतमोजणी केंद्रावरचा दिवस संस्मरणीय ठरला. निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेतही या केंद्रावर स्पष्टपणे दिसून आले.
भाजपाचे माजी महापौर भगवान ऊर्फ बापू घडामोडे हेही विजयी उमेदवारांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते, पत्नीचा पराभव झाला असतानाही त्यांनी अन्य विजयी भाजप उमेदवारांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी इतर विजयी महिला उमेदवारांनी त्यांना धीर दिला. वैयक्तिक पराभवापेक्षा पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, हे विशेष.
मतमोजणी केंद्रावर दिवसभर चाललेल्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. काही ठिकाणी माहिती देण्यास विलंब, तर काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तरीही पोलिस बंदोबस्तामुळे मोठा अनुचित प्रकार टळला.