
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! (Photo Credit - X)
यादीत १६५ मतदारांची निव्वळ वाढ
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादीत ११ लाख १८ हजार ११८ मतदार होते. हरकती व दुरुस्तीनंतर अंतिम यादीत १६५ मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. रावरसपूरा परिसरातील ८१४ मतदार वगळण्यात आले असून छावणी प्रभागातील शांतीपूरा भागात ९४० मतदारांची भर पडली आहे. काही प्रभागांतील मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये ४० हजार ६४९ मतदारांपैकी ६,६५७ मतदार कमी होऊन ही संख्या ३५ हजार ५९३ वर आली आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५,०४७मतदारांची घट होऊन ३५ हजार ६०२ मतदार राहिले आहेत. तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये ४,९३१ मतदार कमी होऊन ३५ हजार ४१५ मतदारांची नोंद आहे.
आचारसंहिता कक्ष, भरारी पथक तैनात
निवडणूक काळात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी मनपा निवडणूक विभागात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्याकडे देण्यात आली असून त्यांना उपायुक्त सविता सोनवणे, जावेदा काझी व रोहित मिसाळ मदत करणार आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते व प्रवेशद्वारांवर भरारी पथके व तपासणी पथके कार्यरत राहणार आहेत. रोख रक्कम वाहतूक व गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत समन्वय ठेवण्यात येणार असल्याचेही श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
१,३९८ मतदान केंद्र; ६,१०० कर्मचारी नियुक्त
निवडणुकीसाठी शहरात एकूण १,३९८ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ९०० मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. एका मतदान केंद्रावर चार कर्मचारी याप्रमाणे सुमारे ५.६०० कर्मचारी आवश्यक असून १० टक्के अतिरिक्त धरून सुमारे ६,१०० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मतदान केंद्रांवरील सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता संजय कोंबडे यांच्याकडे देण्यात आली आहे. बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची जबाबदारी घनकचरा विभागप्रमुख तथा उपायुक्त नंदकिशोर भौबे याच्याकडे देण्यात आली आहे. साहित्य छपाई व वितरणाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व उपायुक्त लखीचंद चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
खासगी शाळांचा आधार
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स तसेच घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. मतदारांना पोलिंग चिटचे वितरणही केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये मतदान केंद्रासाठी खासगी शाळेचा वापर करण्यात येणार आहे.
उमेदवारांना माहिती पुस्तिका देणार
मनपा निवडणूकीसाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना माहिती पुस्तिका दिली जाणार आहे. या माहिती पुस्तिकेत आचारसंहितेचे मार्गदर्शन तत्वे, उमेदवारांसाठी असलेले नियम, मतदान केंद्राची माहिती असणार आहे.
शहरात तीन ठिकाणी होणार मतमोजणी
तीन व चारचे (दोन) प्रभाग मिळून एक या प्रमाणे नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहे. सर्व २९ प्रभागांवी मतमोजणी एसएफएस स्कूल, शासकीय तंत्रशिक्षण विद्यालय (शासकीय तंत्रनिकेतन), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गव्हरमेंट इंजिनिअरींग कॉलेज) या ठिकाणी होणार आहे.