ICICI बँकेतील महिला अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी गंडवले (Photo Credit - X)
फसवणुकीची नेमकी पद्धत
एन-११, सुदर्शननगर, टीव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या दीपाली विजय कोलते (२८) या आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दीपाली कोलते यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) एचआर विभागाच्या नावाने मॅसेज आला आणि त्यांना टेलिग्राम ॲपवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. टेलिग्रामवर ‘रंजिता विजयवर्गिया’ नावाच्या अकाऊंटवरून पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली. विश्वास बसावा म्हणून एनएसई ऑफिसचे फोटो, लेटरपॅड व कंपनीची माहितीही पाठविण्यात आली.
पहिले टास्क आणि पेमेंट
पहिल्या दिवशी हॉटेलच्या फोटोंना ५ स्टार रेटिंग देण्याचे २० टास्क देण्यात आले. ते पूर्ण केल्यावर ₹२०० मानधन थेट बँक खात्यात जमा झाल्याने फिर्यादीचा विश्वास वाढला. दुसऱ्या दिवशी पुन्हा टास्क देण्यात आले. तिसऱ्या टास्कच्या वेळी ₹८०० भरल्यास ३० टक्के कमिशन मिळेल, असे सांगण्यात आले. क्यूआर कोडवर रक्कम भरल्यानंतर एनएसई लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले. त्यानंतर ‘विकास यादव’ या अकाऊंटवरून गोल्ड परचेस ट्रेडिंगचे टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर ‘अपेक्षा पांडे’ या अकाऊंटवरून सेटलमेंट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
‘एरर’ दाखवून पैसे काढले
हळूहळू टास्कच्या नावाखाली ₹१ हजार, ₹२ हजार, ₹१० हजार, ₹५० हजार रुपयांची मागणी सुरू झाली. टास्क चुकला, सिस्टम एरर झाली, ग्रुपमधील इतर मेंबरमुळे अडचण आली अशी कारणे देत पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. ‘८८५५३’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून इतरांनीही रक्कम भरल्याचे भासवण्यात आले. या काळात फिर्यादीकडून आयसीआयसीआय, इंडियन बँक, आयडीबीआय, ॲक्सिस, पंजाब ग्रामीण, येस बँक आदी विविध बँक खात्यांवर क्यूआर कोड, आरटीजीएस व ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम पाठविण्यात आली.
‘अकाऊंट फ्रीज’चे नाटक
पैसे परत मिळतील या अपेक्षेने, प्रत्येक टास्कनंतर “तुमचे गोल्ड अकाऊंट फ्रीज झाले आहे, अनफ्रीजसाठी आणखी रक्कम भरा” असे सांगण्यात आले. शेवटी १२ लाख रुपये भरल्यानंतरही नव्या टास्कच्या नावाखाली पैशांची मागणी झाली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
गुन्हा दाखल
२४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सायबर चोरट्यांनी फिर्यादीची एकूण ₹२६ लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी फिर्यादीने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली, त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






