वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट (Photo Credit - X)
निधीअभावी कंत्राटदाराने काम सोडले
महापालिकेने नगरोत्थान योजनेअंतर्गत मध्य विधानसभा मतदारसंघात ड्रेनेज प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे कंत्राट गुजरात येथील अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. हसूल येथील साईनगर भागात गल्ली-गल्ल्यांमध्ये खोदकाम करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने व बिल रखडल्यामुळे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केले.
खड्डे आणि साचलेले सांडपाणी
काम बंद झाल्यानंतर परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच अनेक अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सात ते आठ गल्ल्यांमध्ये ड्रेनेजची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
तक्रारींचा उपयोग नाही
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी कार्यकारी अभियंता अनिल तनपूरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
‘काम कधी पूर्ण होणार?’
वर्षभर उलटूनही ड्रेनेज लाईनचे काम सुरू झालेले नसल्याने, “हे काम कधी पूर्ण होणार?” असा सवाल साईनगरवासीय नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेले ड्रेनेजचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी साईनगरवासीयांनी केली आहे. या मागणीच्या निवेदनावर निर्मला पवार, संजय कुचे, मदन सानप, कचरू मिसाळ, रामदास बलांडे, श्रीराम काळे, संदीप काळे, मधूकर भालेराव, जगन्नाथ दळवी, संजय गोरे, संगिता वेताळ, सुरेश बुरकुळे, कैलास खमाट, वैभव दळवी आदी नागरिकांच्या सह्या आहेत.






