
संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें (Photo Credit- X)
स्थानिक नेत्यांच्या ‘खेळीवर’ मंत्र्यांचेच पाणी!
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री बावनकुळे शहरात आले होते. सकाळच्या सजत बैठका अन् कार्यक्रम आटोपल्यानंतर भाजपा कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांच्या ‘खेळीवर’ पाणी फेरले. शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या नवीन जलवाहिनीच्या कामाच्या जोरावर स्थानिक नेते मतदान मागायला फिरत आहेत. सत्तेत येऊ द्या, ठरल्याप्रमाणे चोवीस तास नळाला शुध्द पाणी देण्याचे दिव्य स्वप्न प्रचाराची धुरा सांभाळणारे मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड दाखवून मतदारांना वळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
महसूलमंत्री यांनी शिष्टाचार करीत महायुतीबाबत पुढाकार घेतला होता. तीन बैठकीनंतर खुद्द बावनकुळे यांनी अंतिम बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे संकेत दिले होते. असे असतानाही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आदेशाला धुडकावत शिवसेनेशी फारकत घेतली. सकारात्मक असलेली शिंदेसेना अनेक ठिकाणी भाजपाच्या विरोधात उभी राहिली. स्थानिक नेत्यांनी उमेदवारी देताना आप्तांना जवळ करण्याची ‘खेळी’ केल्यावर निष्ठावंतांच्या भावनेचा उद्रेक झाला होता. गीता आचार्य, भदाने, राजकुमार जाधव, कुणाल मराठे यांच्या सारखे निष्ठावंत दुखावले गेले. शिंदे सेनेने ‘दोस्ती’ चा हात पुढे करीत यातील बहुतांश नेत्यांच्या हाती धनुष्य बाण’ तर काहींच्या हाती ‘मशाल’ आली.
बावनकुळे अन् वादळ…
आपल्या बिंदास बोलण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आणि सर्व पक्षांचे चाहते असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी संभाजीनगरात दुपारी पत्रकारांशी संवाद साधला, पत्रकारांनी या निवडणुकीत पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नवीन जलवाहिनी योजना कधीपर्यंत पूर्ण होणार?, संभाजीनगरकरांना स्थानिक नेत्यांकडून खोटी आश्वासने देऊन पुन्हा स्वप्न दाखवले जात असल्याची चर्चा आहे… असा सवाल केला गेला. बावनकुळे म्हणाले, योजना चांगली असून ती पूर्ण होण्यास विलंब होत आहे. प्रत्यक्षात जलकुंभ उभे राहिल्याशिवाय पाण्याचे योग्य वितरण करता येत नाही. अनेक जलकुंभाचे काम अजून बाकी आहे.
अन् सारवासारव…
पाणी योजना पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागल्याचे सांगितल्यानंतर पत्रकारांनी हॉलबाहेर येऊन आपसात चर्चा केली. याची कुणकुण लागताच काही कार्यकर्त्यांनी येऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीचा काळ आहे. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी केलेल्या वर्षभरानंतर पाणी मिळण्याच्या विधानाला प्रसिद्धी देऊ नका, अशी विनंती काही कार्यकत्यांनी पत्रकारांना केली.
आठ दिवसाआड पाणी…
शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे शहर वासियांमध्ये प्रचंड क्षोभआहे. दर वेळेप्रमाणे यंदाची निवडणूक पाण्याच्या मुद्यावरच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आम्ही पाणी देणार असा दावा करत आहे. दरम्यान, सोमवारी महसूल मंत्री बावनकुळे यांनी हेच सांगितले. ते पुढे म्हणाले, शहराच्या संपूर्ण विकासकामावर आमचे लक्ष आहे. शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठीच नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले.
उद्धव ठाकरेंच्या काळात योजना रखडली; बावनकुळेंचा आरोप
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर योजनेचे काम रखडले. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा त्या योजनेला गती दिली. ही योजना पूर्णत्वास जावी यासाठी आता थेट शासनच लक्ष ठेवत आहे. दर महिन्याला मुख्यमंत्री फडणवीस है स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. यामुळे ही योजना पूर्ण होणार परंतु थोडा वेळ लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत वर्षभरानंतर या योजनेतील एकही काम शिल्लक राहणार नसल्याचे त्यानी स्पष्ट केले. पर्यायाने शहराला मुबलक पाणी मिळण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.