
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा (Photo Credit- X)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात जागृती केली, असे गौरवपूर्ण उद्गार काढले. महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि इतरांना जाते. त्यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा केला, ज्याची क्षमता आता १० हजार टीपीडीपर्यंत पोहोचली आहे. ज्या-ज्या भागात सहकार चळवळ आणि सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथे शेतकरी समाधानी झाला आणि औद्योगिकीकरणामुळे तो संपन्न झाला.
LIVE |मा. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व सहकारी कारखाना नुतनीकरण शुभारंभा’निमित्त आयोजित जाहीर सभेमध्ये संबोधन 📍अहिल्यानगर.#Maharashtra https://t.co/BOq49xLvYY — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 5, 2025
डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे जलसंवर्धन चळवळीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निश्चय केला आहे. या प्रकल्पांतर्गत विदर्भामध्ये वैनगंगा-नळगंगा नदीजोड, तापी खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचे काम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उल्हास खोऱ्यातून समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचे काम सुरू आहे. “पुढील पाच ते सात वर्षात टप्प्याटप्प्याने हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांनी सहकाराचे महत्त्व ओळखून स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आणि त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे दिली, या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. सहकार मंत्री अमित शहा यांनी वेगाने निर्णय घेत राज्यातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. साखर कारखान्यांच्या ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ (Circular Economy) साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि साखर कारखान्याचा मालक शेतकरी असल्याने शासन त्याच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार त्वरित आराखडा तयार करत असून, केंद्राच्या सहकार्याने लवकरच भरीव मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.