
भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सवाला पुन्हा एकदा भेट देण्याची संधी मला मिळाली. नॅशनल बुक ट्रस्ट चे मी अभिनंदन करतो कारण वाचन संस्कृतीला एक नवीन दालन आपल्याला मिळालं आहे. ज्ञान आधारित महोत्सवाला पुणेकर नेहमीच गर्दी करतात आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आजची ही गर्दी नाही तर दर्दी आहेत. विचार आणि ज्ञान जर सकारात्मक प्रतिसादाने मिळालं तर ते एक वेगळ्या उंचीवर जातं. पुस्तक महातोसवाचा विस्तार झालेला आहे. पुस्तक महोत्सव नागपूरमध्ये घेतला त्यालाही प्रतिसाद मिळाला आणि गोव्यात सुद्धा आता होतो आहे.
पुढे ते म्हणाले, “मराठी माणसे जे आहेत ती नेहमीच पुस्तकांच्या बाबत वेडी आहेत. महाराष्ट्र साहित्य निर्मिती करण्याचे नंदनवन आहे. सर्वात जास्ती संमेलन महाराष्ट्रात होतातात आणि त्यामुळे आपले राज्य क्रांतिकारी विचाराचे केंद्र राहिले आहे. महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासाठी असा पुस्तक महोत्सव महत्वाचा आहे. विक्रमादित्य राजेश पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झालं आहे. विक्रमादित्य मी मुद्दाम म्हणालो कारण गिनिज रेकॉर्डच्या लोकांना जर कधी विचारलं तर सर्वात जास्त वेळ सहभागी होण्याचं रेकॉर्ड सुद्धा ते करतात. आत्तापर्यंत त्यांनी १५ रेकॉर्ड केले आहेत.”
पुस्तक महोत्सवात “गिनीजगाथा पुस्तकाचे प्रकाशन
पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित “गिनिजगाथा” या पुस्तकात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या १२ गिनीज विश्व विक्रमांचा प्रवास आहे. राजेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषय हाती घेऊन २०१९ सालापासून सुरु झालेल्या या अनोख्या प्रवासात महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवक संघटना आणि सामान्य नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून देशाच्या नावे १२ गिनीज विश्व विक्रम नोंदवले गेले. हा प्रवास केवळ विक्रमांचा नसून, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, संघभावना आणि सकारात्मक सहभागाची चेतना निर्माण करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक उपक्रमांत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी पाठबळ दिले असून, उपस्थितीही लावली.