चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चिपळूण शहरातील कामांमध्ये नागरिकांच्या हिताला डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रांत कार्यालय ते कापसाळ दरम्यान उड्डाण पूल व्हावा, या मागणीसाठी महायुतीच्या शिष्टमंडळाची आमदार शेखर निकम यांच्यासोबत बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पुढील नियोजन निश्चित करण्यात आले असून, लवकरच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरामधून सुरु असलेल्या महामार्गाच्या कामामध्ये हायवे प्रशासनाने सुरुवातीपासूनच नागरिकांच्या हिताचा विचार न करता निर्णय घेतल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. दर्जाहीन काम, अत्यंत संथ गतीने सुरू असलेले काम, नैसर्गिक जलवाहिन्यांचे अडथळे, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनची गळती, चुकीचे भराव, अर्धवट अप्रोच रोड, तसेच पाग पॉवर हाऊस, पाग मळा व पाग नाका येथील अपघातग्रस्त सर्कल्स या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चिंता व्यक्त झाली आहे.
या नियोजनामुळे सुमारे ६ ते ८ हजार रहिवाशांचं जनजीवन विस्कळीत झाले असून, आठ शासकीय कार्यालये, शाळा, वसतिगृहे, हॉस्पिटल्स, समाजभवन आणि वस्ती भागात राहणाऱ्या अल्पसंख्यांक, मागासवर्गीय जनतेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत झाले असून, वृद्ध, लहान मुले आणि महिलांना रस्ते ओलांडणेही धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर, महायुतीतर्फे प्रांत कार्यालय ते कापसाळ दरम्यान उड्डाण पूल व्हावा, ही जोरदार मागणी करण्यात आली आहे. बैठकीत आमदार शेखर सर निकम यांनी, “मी पूर्वीपासूनच उड्डाण पुलासाठी पाठपुरावा करत आहे. आता जनतेचा पाठिंबा ठाम आहे, त्यामुळे या मागणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे स्पष्ट केले. त्याचबरोबर, नागरिकांना सध्या भोगावे लागणाऱ्या त्रासांबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवरील प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
तातडीने गतिरोधक, गतीशिथिल फलक, मोठ्या डायवर्जन बोर्ड्स लावणे, पंचायत समितीजवळ आणि पाग पॉवर हाऊससमोर पोलिस बंदोबस्त उभा करणे यांसारख्या सूचनांची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. तसेच, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी मांडण्यात येणार आहे, व निधीसह मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना शहरप्रमुख उमेश शेठ सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, शहराध्यक्ष मंगेश जाधव, युवासेना अध्यक्ष निहार कोवळे, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे, माजी नगरसेवक विजय शेठ चितळे, आशिष खातू, मनोज जाधव, सुयोग चव्हाण, विनोद पिल्ले, अभिजीत सावर्डेकर, उमेश उत्तम सकपाळ, अमोल प्रभाकर कदम, प्रशितोष कदम, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विशाल जानवलकर, समीर जानवलकर, महायुती समन्वयक उदय ओतारी व इतर मान्यवर उपस्थित होते.