डोंबिवली-अमजद खान : एमआयडीसी निवासी आणि आसपासच्या परिसरात रासायनिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. गटारातून रासायनिक सांडपाणी वाहत असल्याने त्याच्या उग्र वासामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करून देखील ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्रस्त नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. 3 हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक प्रतिनिधी, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर ही प्रदूषणाबाबत उपयोजना झाली नाही तर येत्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना जबाब विचारणार आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे सांगितले.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी फुटलेल्या वाहिन्यामधून केमिकल मिश्रित सांडपाणी गटारातून, नाल्यातून वाहत असते. या रासायनिक सांडपाण्याच्या उग्र वासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आणि निवेदन दिली आहेत. मात्र आश्वासन पलीकडे काहीच ठोस कारवाई होत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्याबाबत डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसराचा आसपासच्या परिसरातील स्थानिक नागरिक एकवटले आहेत. ही समस्या निकाली काढण्यासाठी चाणक नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
तब्बल 3 हजार सह्यांचे निवेदन स्थानिक नागरिकांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी देण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. यातूनही प्रदूषण थांबले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील सर्व पक्षातील उमेदवारांना याबद्दल जाब विचारण्यात येईल, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल असा इशारा देखील स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.