शिक्रापूर : कासारी (ता.शिरुर) येथे गेली काही दिवस पाण्याचा दुष्काळ जाणवत होता. मात्र, या परिसरात अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे संपूर्ण गावच जलमय होऊन ओढ्यांना अचानक पूर आला. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले.
कासारी (ता.शिरुर) येथे सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटामध्ये जोरदार पावसास सुरूवात झाली. तब्बल तासभर जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील शेताचे बांध फुटून माती वाहून गेली. तर गावातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित होऊन जोरदार पावसामुळे काही वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले.
या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने शेतींनाही तळ्याचे स्वरूप आले होते. तर पावसामुळे वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले असून, गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, यावेळी झालेल्या पावसामुळे येथील पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
शेतीचे मोठं नुकसान
कासारी येथे अचानक मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने येथील शेतींची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सध्या केली जात आहे.