Devendra Fadnavis: "कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक..."; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा
शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण केले सुरू
कृषी क्षेत्रातही AI चा वापर सुरू
मुंबई: आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा नाहीत त्यामुळे श्रीमंत-गरीब, जाती, भाषा असा फरक करत नाही. म्हणूनच हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या उत्सवाचे मेहबुब स्टुडिओ, वांद्रे येथे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असून यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे. शासनाने एचपी सोबत डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले असून आता आणखी पुढे जाऊन सर्वसामान्यांना नव्या तंत्रज्ञानांचा, विशेषतः AI चा, सहज प्रवेश मिळावा यासाठी भागीदारीचा आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे.
🔸 Launch of 'HP Dreams Unlocked Season 1' at the hands of CM Devendra Fadnavis.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीझन 1'चे उदघाटन.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीजन 1' का उदघाटन। 🕦 11.30am |… pic.twitter.com/mWACIM8Xqx — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2025
कृषी क्षेत्रातही AI चा वापर सुरू केला आहे. पुण्यात झालेल्या अॅग्री-हॅकथॉनमध्ये तरुणांनी तयार केलेले AI मॉडेल हे हवेतील घटकांचे विश्लेषण करून पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि सर्तक करते. हे खरोखरच गेम-चेंजर मॉडेल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, अशा तांत्रिक हस्तक्षेपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, खर्च कमी होईल आणि कृषीक्षेत्रात अधिक नफा मिळेल. AI, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशन या तंत्रज्ञानांनी केवळ उद्योगच नव्हे तर शासन प्रणालीतही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात देशभरातील जवळपास 40 हजार तरुणांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 40 सर्वोत्तम नवीन कल्पक उपक्रमांचा सन्मान करण्यात आला. हे 40 नवीन उपक्रम समाजात आणि अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष परिणाम करू शकतील या उपक्रमांच्या माध्यमातून नागरीकांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राज्य शासन नदीजोड प्रकल्प तातडीने राबवणार असून, यामुळे पुढील पाच ते सात वर्षांत मराठवाडा, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांतील दुष्काळ केवळ भूतकाळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.