Devendra Fadnavis: "बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे अन् इंग्रजीला..."; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
मुंबई: आज महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री रवींद्र चव्हाण यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निवडणूक निरीक्षक किरेण रिजिजू आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
वरळी येथील भाजपच्या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या देशात नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र आले. हे सूत्र कसे स्वीकारले पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारन समिती तयार केली. पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषा सक्तीची करावी असा समितीचा अहवाल त्याकाळात सरकारने स्वीकारला. कॅबिनेटने हा अहवाल स्वीकारला. आम्ही तिसरी भाषा हिंदी म्हणून शिकता येईल असा निर्णय केल्यावर हिंदीची सक्ती असे बोलणे सुरू केले. या महाराष्ट्रामध्ये मराठीच सक्तीची भाषा आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचे आणि इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा. हे आम्ही सहन करणार नाही. समिती स्थापन केली. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा जो काही निर्णय असेल तो आम्ही घेऊ. आम्ही राज्याच्या हिताचे राजकारण करणारे लोक आहोत. आम्ही बोलबच्चन भैरवी नाही आहोत. राज्यात काम करणारे कोण आहेत, हे जनतेला माहिती आहे.”
RSS कार्यकर्ते ते भाजप प्रदेशाध्यक्ष झालेले कोण आहेत रवींद्र चव्हाण?
राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये आता भाजप महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पक्षामध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेले रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. मागील 25 वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांनी समाजकारण आणि राजकारण केलेले आहे. आता त्यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी त्यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डोंबिवलीमधील असलेले रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नगरसेवक पदापासून राजकारणामध्ये सुरुवात केलेले रवींद्र चव्हाण यांनी आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली आहे. 2002 साली त्यांची भाजपच्या युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरु आहे. 2009 सालापासून रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमददार म्हणून निवडून आले. त्यांनी डोंबिवलीमध्ये विजयाची हॅटट्रीक केली.