1. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे.
2. दावोसमधून महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली
3. ॲमेझॉन करणार मोठी गुंतवणूक
मुंबई: महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ‘ क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर’ क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासन उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करणे सहज व सोपे होण्यासाठी विविध योजनांवर काम करीत आहे. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांचा कालावधी कमी करणे, प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ‘इज ऑफ डूईंग बिजनेस’ वॉर रूम च्या माध्यमातून जलद गतीने कार्यवाही होत आहे. उद्योजकांना परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावांची ‘रिअल टाइम इन्फॉर्मेशन’ देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
यावेळी ॲमेझॉनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेतील सिएटल येथील कंपनीच्या मुख्यालयाला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले. राज्यात वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन मोबाईल स्टेम लॅब उपक्रम अंतर्गत भारतातील पहिल्या ‘ थिंक बिग मोबाईल व्हॅन’ चे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. ही व्हॅन मुंबई शहरात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध संशोधन, नव विचारांनी शिक्षित करणार आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक खेचून आणणारे आपले राज्य आहे. कमी कालावधीत या गुंतवणुकीचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी सुधारणा करण्यात येत आहेत. नवीन उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ वॉर रूम बैठकीत सुधारणांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उद्योगासाठी लागणाऱ्या बऱ्याच परवानग्या अनेक विभागांशी संबंधित असतात. अशावेळी एकाच अर्जामध्ये संबंधित सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करावी. पुन्हा अर्ज करण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रदूषणाच्या बाबतीत हिरव्या श्रेणीत ( ग्रीन कॅटेगरी) असलेल्या उद्योगांना पुढील काही ठराविक वर्षांसाठी विविध परवाना घेण्याची गरज राहणार नाही, अशी व्यवस्था करावी. दिलेल्या कालावधीनंतर परवाने देऊन नियमन करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.