Devendra Fadnavis: "राज्य सरकार आणि केंब्रिजमधील सामंजस्य करार हा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
1. राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होणार
2. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
3. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला करार
मुंबई: महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाकडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर केंब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ आणि राज्याच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी स्वाक्षरी केली.
Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळविण्याच्या दिलेल्या संधीच्या दिशेने महाराष्ट्राने प्रवास सुरू केला आहे. या करारामुळे केंब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळवून देता येईल. या करारामुळे तो प्रवास अधिक फलदायी ठरेल. केंब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असल्याचे नमूद करताना त्यांनी, केंब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. आज आपण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, तथापि हे पहिले पाऊल असून अजून मोठा प्रवास बाकी आहे. या प्रवासात आपण केंब्रिजसोबत भागीदार राहणार आहोत. मी स्वतः या कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
‘केंब्रिज’सोबतचा करार शालेय शिक्षणात ऐतिहासिक पाऊल – डॉ. पंकज भोयर
महाराष्ट्र राज्य प्रशासन, पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांत सातत्याने नवे आदर्श निर्माण करत आहे. आज केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे शालेय शिक्षणात जागतिक दर्जाकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले. हा करार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आणि नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण व नेतृत्वक्षम तरुणांना दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🤝 CM Devendra Fadnavis presided over a MoU signing and exchange between the School Education & Sports Department, Government of Maharashtra and Cambridge University Press and Assessment India Private Limited for promoting various educational initiatives in schools.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 18, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात पीएम श्री स्कूल्स सुरू असून त्या शाळा शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्य विकास आणि सर्वांगीण शिक्षणासाठी आदर्श ठरणार आहेत. आपल्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये लाखो सामान्य कुटुंबातील मुले असामान्य स्वप्ने पाहतात. या मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर दर्जेदार गुणवत्ता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्याकडे आपण पुढे पाऊल टाकले असल्याचे डॉ. भोयर म्हणाले.
Devendra Fadnavis: ‘एक कोटी लाडक्या बहिणींना…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार
या ज्ञान भागीदारीतून हवामान शिक्षण, अभ्यासक्रम सुधारणा, ग्रंथालय व शैक्षणिक साधनसंपत्ती उपलब्ध करून देणे, शिक्षक क्षमतावृद्धी आणि ओपन स्कूलिंग उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. ही मोहीम केवळ गुणपत्रिका सुधारण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कौशल्य व जागतिक स्तरावरील तयारी देण्यासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित भारत’ दृष्टीकोनातून महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. केंब्रिजसोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
प्रधान सचिव देओल यांनी प्रास्ताविकात या कराराबाबत माहिती दिली. तर, केंब्रिजचे रॉड स्मिथ यांनी महाराष्ट्र शासनासोबतचा करार हा आमचा सन्मान असल्याची भावना व्यक्त करुन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. हा करार इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.