अमेरिकेने ५०% कर लादल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क, फडणवीस यांनी मुंबईत घेतली उच्चस्तरीय बैठक (फोटो सौजन्य-X)
CM Fadnavis Reviews US Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५% कर आकारण्याचा नियम लागू झाला आहे. या निर्णयामागील कारण भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करणे असल्याचे सांगितले जाते. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव करचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीत असे ठरले की, प्रथम त्याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासानंतर काय करता येईल याचा विचार केला जाईल. आपल्याला आपले उद्योग वाचवायचे आहेत. त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना ट्रम्प यांच्या करचा कोणत्या राज्यावर किती परिणाम होत आहे याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे आणि शक्य तितक्या लवकर अहवाल मागितला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांना बोलावून उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्य कर आणि वस्तू आणि सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मित्राचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, मित्राचे आर्थिक तज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थशास्त्रज्ञ ऋषी शाह उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा राज्याच्या निर्यात-केंद्रित उद्योगांवर होणारा संभाव्य परिणाम आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. केंद्र सरकारशी तात्काळ समन्वय साधून राज्याच्या उद्योगांचे आणि अर्थव्यवस्थेचे हित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि योजना ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेतले जाईल. राज्य सरकार प्रथम राज्याच्या उद्योगांचे हित जपण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. या बैठकीत जीडीपी, रोजगार, वाणिज्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% शुल्क लादले होते, जे २७ ऑगस्टपासून ५०% पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय व्यापारावर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, कापड, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषध क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.