जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला
शिरोली : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावरिल श्री गणेश सहकारी पाणी पुरवठा या संस्थेचा उपसा जलसिंचन जॅकवेल पंचगंगा नदीत कोसळला. जॅकवेलमध्ये असलेल्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या या जलसिंचन योजनेचे ३३ लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे मौजे वडगाव गावातील शेतीचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे व राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे गेल्या चार दिवसात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. जॅकवेल भोवतीच्या नदीपात्रालगतचा मातीचा भराव खचल्याने जॅकवेल नदी पात्रात कोसळला. जॅकवेल नदीपात्रात पडल्याने शेतकऱ्यांच्या या सिंचन योजनेच्या जॅकवेलमध्ये असलेल्या १०० अश्वशक्तीच्या ३ विद्युत मोटारी, ३ पंपसेट, टर्बाइन पंप, पाईप लाईन, नदीपात्रात बुडून वाहून गेल्या आहेत.
हेदेखील वाचा : Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
मौजे वडगाव गावातील श्रीकांत सावंत, नामदेव चौगुले, रावसाहेब चौगुले, मनोहर चौगले यांच्या पाठपुराव्याने व मेजर कै. गणपतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा भुविकास बँकेचे कर्ज घेऊन ४० वर्षापूर्वी श्री गणेश सहकारी पाणी पुरवठा उपसा जलसिंचन योजना सुरू केली होती. सध्या जॅकवेल व विद्युत मोटारी पाण्यात पूर्णपणे बुडाल्याने व काही भाग वाहून गेल्याने शेतीला पर्यायी पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे.
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर किरवे तसेच खोकुरले येथे रस्त्यावर पाणी आले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होऊन कोकणात जाणारी वाहतूक टप्प झाली आहे.