कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला (फोटो सौजन्य- X)
भोगावती : कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयात प्रचंड वेगाने पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जलाशयात ८.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशयातून ११५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.
कोल्हापूर शहर, शिरोळ, राधानगरी, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर अशा मोठ्या भागांना शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणारा राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय ८.३६ टीएमसी जलसाठा क्षमतेचा आहे. या तलावास कोल्हापूरची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. तलावाची निर्मिती कोल्हापुर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराज यांनी केली. संपूर्ण भारतात रोल मॉडेल म्हणून ओळखला जाणारा तलाव अतिशय मजबूत आणि दणकट आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास सांडवाऐवजी स्वयंचलित सात दरवाजे बसवण्यात आले आहेत.
अतिशय सुरेख असे दरवाजे पाण्याच्या दाबावर कार्यरत आहेत. एक दरवाज्यास 35 टन वजनाचे सिमेंट ब्लॉक बसवले आहेत. पाण्याचा दाब वाढत गेल्यास सुरूवातीला सहा क्रमांक दरवाजा उघडतो, नंतर तीन क्रमांकाचा दरवाजा उघडला जातो. पाण्याची आवक जोराने वाढत राहिल्याने सात दरवाजे आपोआप खुले होतात आणि पाण्याचा विसर्ग प्रति सेकंद साडे अकरा हजार क्युसेक भोगावती नदीत सुरु राहतो. प्रत्येक वर्षी हा जलाशय पूर्ण क्षमतेने पाण्याने तुडुंब भरतो, हे या तलावाचे वैशिष्ट्य आहे.
गेले तीन दिवस राधानगरी धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पावसामुळे जलाशयात पाण्याची पातळी मोट्या गतीने वाढली आहे. जलाशय शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या जलाशयातून वीज गृहातून १५०० आणि सात स्वयंचलित दरवाजातून ९९९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु झाला आहे. संततधार पावसामुळे भोगावती नदीला महापूर आला असून, तारळे, शिरगाव, राशिवडे, हळदी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या पावसाचे प्रमाण वाढत असल्याने भोगावती नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राधानगरी तालुक्यतील राजर्षी शाहू सागर जलाशय काळमवाडी या तलावात 22 टीएमसी पाणीसाठा असून, अतिरिक्त पाणी विजगृहातून दुधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू ठेवला आहे. धामोड येथील तुळशी जलाशय पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून, या तलावातून पाचशे क्युसेस पाणी विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू आहे. तर धामणी तलावात एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे.