Congress Arvind Shinde anoints Mahatma Gandhi statue with milk at Pune railway station
पुणे : शहरातील रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. पुणे रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरुने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयता फिरवला. यानंतर जोरदार वातावरण तापले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर विटंबनात्मक हल्ला केल्यामुळे पुणे शहर कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. कॉंग्रेसकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांचा पुतळ्यावर माथेफिरु असलेल्या सूरज शुक्ला याने हल्ला केला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेच्या विरोधात पुणे शहर कॉंग्रेस आक्रमक झाले आहे. पुणे स्टेशन परिसरामध्ये कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासोबत असा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक देखील केला. क्रेन आणून कॉंग्रेस नेत्यांनी हा दुग्धाभिषेक केला आहे.
नामांतरानंतर आता विटंबनाचे प्रकरण
अरविंद शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मागील 12 वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या विटंबनाच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत,” अशी मागणी कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.