शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा, पंचनामे सोडा अन् तात्काळ मदत करा; काँग्रेसची मागणी
मुंबई : राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ आश्वासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पशुधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाही, मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे करा अशा सुचना मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.
काँग्रेस नेते शेतकऱ्यांच्या बांधावर
काँग्रेस सरकार असताना पिकाचे लाल्या रोग, बोंड आळीने नुकसान केले, गारपीट चक्रीवादळाने नुकसान केली की तातडीने मदत दिली जात पण भाजपा युतीचे सरकार मात्र नियम, अटी, शर्ती यातच अडकून पडले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असताना पंचनामे कसले करता, आधी मदत द्या, मग कागदी सोपस्कार पूर्ण करा. सरकारचे मंत्री झोपले असताना काँग्रेसने समिती नेमून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, राजेंद्र राख, राजेश राठोड, लहु शेवाळे हे नुकसानीची पाहणी करणार आहेत. लातूर, बीड, व धाराशीव जिल्ह्यात खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री अशोक पाटील, दादासाहेब मुंडे, पांडुरंग कुंभार. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात खासदार रविंद्र चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, आ. डॉ. प्रज्ञा सातव, बाळासाहेब देशमुख, प्रा. यशपाल भिंगे. अमरावती विभागात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. अमित झनक, आ. अनिल मांगूळकर, विरेंद्र जगताप, महेश गणगणे, प्रकाश तायडे. नागपूर विभागात खासदार नामदेव किरसान, प्रशांत पडोळे, शामकुमार बर्वे, सुरेश भोयर, रविंद्र दरेकर, संतोषसिंह रावत. उत्तर महाराष्ट्रात खासदार शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, राजाराम पानगव्हाणे, संदिप पाटील, हेमंत ओगले, दरबारसिंग गिरासे यांचे पथक पाहणी करेल तर सोलापूर जिल्ह्यात खासदार प्रणिती शिंदे, प्रकाश यलगुलवार, रामहरी रुपनवर, अलका राठोड, विनोद भोसले हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.