
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, तर...; काँग्रेसची मागणी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले आहे. जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला यासंदर्भात ई-मेल पाठवला आहे. या जमीन प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
जैन बोर्डींगची जमीन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिळंकृत करु पहात होते पण हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुरलीधर मोहोळ यांना वाचवण्यासाठी तो व्यवहार रद्द करावा लागला आहे. परंतु हा व्यवहार रद्द करून चालणार नाही तर या व्यवहारात जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. जमीन हडप करण्याच्या कटात कोण कोण होते याचा पर्दाफाश झाला पाहजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर केलेली टीका राजधर्माला शोभा देत नाही, असे प्रत्युत्तर सपकाळ यांनी दिले आहे.
भाजपा ही वॉशिंग मशीन आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांनाच पक्षात व सत्तेत सहभागी करून पवित्र करुन टाकले आहे. फलटणच्या घटनेत माजी खासदाराचा उल्लेख होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लिन चिट देणे म्हणजे त्यांचा या कटात सहभाग असल्याचा पुरावाच असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड
महायुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याने त्यांच्याकडे योजनांसाठी पैसाच नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे नाहीत, लाडकी बहिण योजनेसाठी पैसे देऊ शकत नाही. पंतप्रधान महाराष्ट्रात येणार म्हणून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे पॅकेज फसवे आहे हे आम्ही आधीच सांगितले होते आता या पॅकेजचा फोलपणा समोर येत आहे. हे पॅकेज एक थोतांड आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत तसेच कर्जमाफी करावी. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.