पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; 'या' तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन सरकारविरोधात रस्त्यावर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आहे, अशी महिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.
गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून, १०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकं, फळबागा बाधित झाल्या आहेत. लाखो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो जनावरांचा मृत्यू झाला, लाखो घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व वस्तूंची प्रचंड नासाडी झाली आहे. हजारो घरे कोसळल्याने लोकं बेघर झाले आहेत. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपये मदत द्यावी व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ही मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे. पण सत्तेच्या मस्तीत मदमस्त झालेले महाभ्रष्ट महायुती सरकार या संकटाकडे डोळेझाक करत आहे. अशी टीका काँग्रेसने केली आहे.
या मुक्या बहिऱ्या सरकारला जागे करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसतर्फे मोर्चा, धरणे / आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.
बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांच्या ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी थोरात यांनी यावेळी केली.