शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा...; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा सरकारला इशारा
अमरावती : देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिरा गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावतीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु देशमुख, शहराध्यक्ष बबलु शेखावत यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत. देशाच्या सीमेवर जवानांनी आपल्या शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला धडा शिकवला याबदद्ल सर्वांना अभिमान आहे पण इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहे, सरकारचे त्याकडे लक्ष नाही, कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर १२ हजार रुपयावरून ६ हजार रुपये झाली आहे. कारण शेतकऱ्याची तूर बाजारात येत असताना केंद्रातील भाजपा सरकारने तूर आयात करून भाव पाडले. सोयाबिन ४ हजार रुपयांच्या वर जात नाही, शेतमालाला भाव नाही. पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सावकारच्या दारात उभे रहावे लागत आहे. या परिस्थितीला फडणवीसांचे सुलतानी सरकार जबाबदार आहे.
काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीने आंधळ्या, बहिऱ्या सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण सरकारने बळीराजाला नाडवले, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि शेतमालाला योग्य भाव मिळला नाही तर हा लढा आणखी तीव्र करू आणि त्यानंतर जो परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, जय जवान, जय किसान, अशा घोषणा या रॅलीत देण्यात आल्या.
राज्यभर काँग्रेसची “तिरंगा यात्रा”
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्यात तिरंगा यात्रा काढून ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘जरा याद करो कुर्बानी’ या प्रेरणादायी संकल्पनेतून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.