सिद्धेश प्रधान। नवी मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर भाजपाची डोकेदुखी अधिक वाढलेली दिसत आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते पक्षाची शिस्त मोडून उघडपणे एकमेकांसमोर ठाककेले दिसून येत आहेत. नवी मुंबईत मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक म्हणजेच ताई विरुद्ध दादा असा वाद गेली कित्येक वर्ष नवी मुंबईकर अनुभवत आहेत. आता उघडपणे माजी आमदार संदीप नाईक यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत ताई विरुद्ध भाई अशा या वादाला नवे नाव मिळाले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना आमदार म्हात्रे यांनी वाशीत जनसंपर्क कार्यालय उघडल्यावर आता, माजी आमदार संदिप नाईक यांनी बेलापुरात जनसंपर्क कार्यालय उघडून थेट आव्हान देत आमदारकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्यास पक्षातील नाईक समर्थक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, तसेच जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील समर्थन दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुफळी देवेंद्र फडणवीस कशी शमवतात हे पाहावे लागणार आहे.
गेली दोन टर्म आमदार मंदा म्हात्रे या बेलापुर विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. गेली दहा वर्ष मतदार संघात निधी आणत विकास कामांचा रतीब आमदार मंदा म्हात्रे यांनी लावला आहे. त्यांच्या या विकासाचा वेग आमदार गणेश नाईकांना रोखता आलेला नाही हे विरोधक देखील नाकारणार नाहीत. मात्र गेली २५ ते ३० वर्ष नवी मुंबईवर अनभिषिक्त सम्राटासारखे वावरणारे आमदार गणेश नाईक यांची २०१४ साली पराभव झाल्यापासून राजकारणात उतरती कळा सुरू झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात तर त्याच दरम्यान माजी आमदार संदिप नाईक हे मात्र नवी मुंबईत तरुण नेतृत्व म्हणून आपली खुंटी बळकट करत होते. २०१९ साली वडिलांसाठी आपल्या आमदारकीचा त्याग करून संदिप नाईक यांनी कायम चर्चेत राहणे पसंत केले. मात्र तरीही संदिप नाईक यांची राजकीय महत्वाकांक्षा कायम खुणावत होती. त्यात पक्षातून विरोध होत असतानाच जिल्हाध्यक्ष पद मिळवून त्यांनी चातुरपणा दाखवून दिला.
२०१४ पासून बेलापुर विधानसभा क्षेत्रात काहीसा थांडवलेला वावर अधिकृतपणे वाढवण्यास संदिप नाईक यांना संधी मिळाली. त्यातून त्यांनी राजकीय वाटचालीचे पुढील मनसुबे दाखवून दिले होते. दुसरीकडे माजी खासदार संजीव नाईक यांचे तिकीट कापले जाणार हे सर्वश्रुत असतानाच आणि ते माहीत असताना देखील, संदिप नाईकांच्या नावाची चर्चा देखील केंद्रात चर्चेत राहील याची काळजी नवी मुंबईतून घेण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्यासोबत काही जुने भाजपाचे पदाधिकारी कार्यरत होते. लोकसभेला बेलापुरमधून मतदान करून आपले मनसुबे संदिप नाईकांनी उघड केले होते. त्यानंतर खुद्द पदाधिकारी, नगरसेवकांना विधानसभेच्या तयारीसाठी विभागनिहाय कामकाज सुरू करण्याचे आदेश देखील दिले गेल्याचे पदाधिकारी खासगीत सांगतात. ही छूपी यंत्रणा राबवताना, गुरुवारी संदिप नाईक यांनी खुलेआम जनसंपर्क कार्यालय उघडुन स्वतःचे थेट ब्रॅण्डिंग यानिमित्ताने केल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांना ठरवून दिलेल्या घोषणा देखील यानिमित्ताने भाईंच्या समर्थनार्थ तर ताईंच्या विरोधात दिला गेल्याने, आता भाजपात उमेदवारीवरून दुफळी निर्माण झाली आहे.
एकीकडे ऐरोली विधानसभेत शिंदे गट ताकदवान बनलेला असतानाच, संदिप नाईक यांनी बेलापुर हे सेफ मतदार संघ निवडला आहे. या भागात शिंदे गटाची तितकीशी ताकद नसून, या मतदार संघात ठाकरे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील आपलेसे करण्याची रणनीती संदिप नाईक यांनी आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकीकडे आमदार मंदा म्हात्रे यांनी कामाचा धडका लावला आहे. संघटन बांधणीत आमदार म्हात्रे या कमी वाटत असल्याने संदिप नाईक यांना, त्या आधारावर तिकीटाची अपेक्षा आहे. त्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्या ‘धारदार’ वाणीने दुखावलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपलेसे केले जात आहे. तसेच भाजपाचे मुळ असलेल्या संघाशी देखील जवळीक साधली जात आहे.
भाजपाकडे नवी मुंबईत एकही तगडी महिला नाही. आमदार मंदा म्हात्रे यांच्यामार्फत एक आक्रमक नेतृत्व भाजपाला मिळाले होते. संघटन बांधणीत कमी पडलेल्या आमदार म्हात्रेंनी दहा वर्षांत आपल्या कामातून नाईकांना मागे टाकल्याचे विकास कामांच्या यादीतून ठळकपणे दिसून येते. याची पक्षाला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे महिला उमेदवारांवर भाजपा अन्याय करणार की, नाईकांना एकाच तिकिटावर समाधान मानावे लागणार ते पाहावे लागणार आहे. अन्यथा ताईंकडून महीला कार्ड खेळले जाण्याची शक्यता आहे.